नंदुरबार l प्रतिनिधी
संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रयत्नातून वाडी प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील नटावदसह 10 गावांमध्ये विविध सहाय्य देऊन विकास कार्यक्रम राबविणे सुरू आहे. खासदार असताना डॉक्टर हिना गावित यांनी केंद्र सरकारकडून ही विशेष योजना येथे लागू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून नटावद येथील आदिवासी शेतकरी बांधवांना माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते 17 बचत गटांना शेळी वाटप करण्यात आले.
नाबार्डच्या सहयोगाने राबविण्यात आलेल्या सांसद संकुल परियोजना अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रम व वाडी प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत हा फळबाग लागवड प्रशिक्षण आणि शेळ्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला. संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर कुमुदिनी गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंचा अर्चना गावीत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश गावित, युवा मित्र सुनील चव्हाण, उमेद च्या मनीषा पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी 17 बचत गटांना प्रत्येकी एक बोकड व चार बकऱ्या वाटप करण्यात आल्या.
संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी याप्रसंगी भाषणातून अधिक माहिती देताना सांगितले की, वाडी प्रकल्प अंतर्गत दहागाव दत्तक घेऊन त्यांचा विविध अंगाने विकास घडावा यासाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ देणे सुरू आहे. शेतीपूरक व्यवसाय देणे, शेतीला आणि घराला पुरेसे पाणी मिळेल अशी व्यवस्था करून देणे, गावांमधील रस्ते आणि तत्सम सुविधा करून देणे त्याचबरोबर या दत्तक गावातील मागास घटकांचा आर्थिक विकास घडावा हा दृष्टिकोन ठेवून कार्यक्रम राबविले जात आहेत.
नटावद येथील 120 शेतकऱ्यांपैकी 40 शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून पाणी योजना करून देण्यात आली. 17 बचत गटांमधील सदस्यांना आर्थिक विकास करून देणारे लाभ दिले जात आहेत. शेती पूरक व्यवसाय मिळावा म्हणून आता शेळी वाटप करण्यात आले आहे. आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ठेवून वेळोवेळी लाभ घेतला तर प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ मिळू शकतो असेही डॉक्टर हिना म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. पेव्हर ब्लॉक बसवणे, गाव रस्ता बनवणे, गावातील पाणी व्यवस्था सुरळीत ठेवणे अशा सर्व विकास कामांना चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी पुरेसा निधी देण्यात आलेला आहे असेही डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाल्या.
तर माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रमुख भाषणात सांगितले की, कामगार मजूर शेतकरी यांच्यासह सर्व दुर्लक्षित घटकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनाने भरपूर योजना दिलेल्या आहेत. त्या योजना आणि कार्यक्रम गावा गावापर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक काम आम्ही आजपर्यंत केले. प्रत्येक गावातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचे आमचे हे कार्य यापुढेही चालू राहील. वाटप करण्यात आलेल्या शेळ्यांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय वाढीस लावता येईल त्याचबरोबर बकऱ्यांची लेंडी मूत्र याला सुद्धा औषध व्यवसायात महत्त्व प्राप्त झाले असल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी त्याचाही लाभ घ्यावा; असे आवाहन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.