नंदुरबार l प्रतिनिधी
सत्कार प्रेरणादायी असतात. एकाला दिलेली कौतुकाची थाप अनेकांना प्रेरीत करते. तथापि मुला मुलींमधला जो भेदभाव पाहायला मिळतो तो दूर करण्याचं काम प्राधान्याने करणे ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण समानतेच्या गोष्टी करतो तेव्हा मुलींना समान वागणूक दिली गेली पाहिजे; असे विचार संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाषणात व्यक्त केले.
नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या राष्ट्रीय स्तरावरील राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न, समाज भूषण, महिला रत्न, कृषी रत्न ईत्यादी पुरस्कारांचे वितरण रविवार दि. 27 जुलै 2025 रोजी संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले. वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या.
आदिवासी जिल्हा असून देखील मुलींच्या सन्मानात नंदुरबार जिल्हा अग्रेसर आहे, असे स्पष्ट करताना डॉक्टर हिना गावित यांनी भाषणात सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला कुठेही स्त्रीभ्रूण हत्या हा प्रकार नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला नाही मिळणार उलट आमच्या इथे मुलींचा सन्मान केला जातो. 2001 ची जनगणना झाली तेव्हा नंदुरबार जिल्हा हा मुलींच्या संख्येमध्ये महाराष्ट्रात सर्वात प्रथम होता. म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये मुलींची संख्या ही मुलांपेक्षा जास्त होती. आम्ही नेहमीच अभिमानाने सांगतो की आमच्या जिल्ह्यामध्ये मुलींची संख्या ही मुलांपेक्षा नक्कीच जास्त आहे; असेही त्या म्हणाल्या.
डॉ. हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात जिल्हा पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, जात पडताळणी अधीक्षक आत्माराम प्रधान, नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, महाराष्ट्राचे मुख्य संयोजक डॉक्टर इंजिनिअर अरुण सगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर नंदुरबार जिल्हा समता परिषद अध्यक्ष राजेंद्र वाघ, फोरमच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्ष डॉ. ज्योती आर. लष्करी, योगेश बागुल, ईश्वर पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख भाषणात जात पडताळणी अधीक्षक आत्माराम प्रधान यांनी सांगितले की, मुलींना स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. हसली की फसली, हा मुलींचा स्वभाव पालटणे काळाची गरज आहे, जात अभिमान कुठेही उपयोगात येत नाही; असे सांगतानाच कर्तृत्ववान बनून सर्व जातीचे बनू या; असे आवाहन प्रधान यांनी केले.
फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. महिलांवरील अत्याचार निवारण करणे त्याचबरोबर पोलीस मित्र बनवून कार्य करणे हे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक पालकाने मुलींना व मुलांना गुड-बॅड टचचे शिक्षण द्यावे तसेच मुलींना स्वसंरक्षणाचे शिक्षण देण्यावर भर द्यावा असे आवाहन केले. प्राचार्य डॉक्टर ज्योती लष्करी, प्रा. संजय शिंदे, प्रा. गहिवरे, मुहम्मद खाटिक यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन चंद्रकांत बोराडे यांनी केले.