नंदुरबार l प्रतिनिधी
ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुपद्वारे शेअर्स खरेदी, ट्रेडिंग मध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली होती.फिर्यादी यांना ऑनलाईन फसवणूकीत गमावलेले पैसे परत मिळवून देण्यात सायबर पोलीसांना यश आले आहे.
उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी फिर्यादी मार्तंड देशपांडे, रा. कोरीट नाका, नंदुरबार हे व्यवसायाने डॉक्टर असुन त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे ज्ञान असल्याने ते वेळोवेळी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करीत होते. मागील काही दिवसांपासुन सदर फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर शेअर मार्केट संबंधी शिकायचे असल्यास एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील होणेबाबत मेसेज येत होते.
सदर येणाऱ्या मॅसेजचे एका ग्रुपवर फिर्यादी हे सामील झाले होते. त्यानंतर फिर्यादी हे सामील झालेल्या शेअर मार्केट संबंधी ग्रुपवर वेळोवेळी गुंतवणूकीवर व ट्रेडिंगवर चांगला परतावा मिळण्यासाठी सदर ग्रुपवरील सदस्यांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या इसमाने एक अॅप डाउनलोड करावयास सांगितले. फिर्यादी हे सदर आमिषाला बळी पडले व त्यांनी डाऊनलोड केलेल्या अॅपद्वारे फिर्यादी यांची एकुण 25 लाख 66 हजार 17 रुपयांची फसवणूक झाली होती. त्याअन्वये नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात भा. न्या. संहिता कलम 318(4), 336(3) सह माहिती तंत्रज्ञान अधि. कलम 66 (ड) वगैरे प्रमाणे ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता,
सदर गुन्हयाचा सायबर पोलीस सेलचे प्रभारी हेमंत पाटील यांच्याकडून तपास सुरु असतांना सायबर पोलीसांनी नमुद गुन्हयात फिर्यादी यांची फसवणूक करणाऱ्या इसमांचे बँक अकाऊंटची माहिती घेऊन ते अकाऊंट तात्काळ गोठविण्यात यावे यासाठी कार्यवाही केली. त्याद्वारे गुन्हयातील फसवणुक करणाऱ्या इसमांची बँक अकाऊंट
मधील रक्कम ही तात्काळ गोठविण्यात आल्याने फिर्यादी यांचे एकुण रकमेपैकी 8 लाख 21 हजार रुपये न्यायालयाचे परवानगीने परत मिळवून देण्यात सायबर पोलीसांना यश मिळाले आहे. सदर कामगिरीबाबत फिर्यादी यांनी समाधान व्यक्त केले असुन जिल्हा पोलीसांचे आभार मानले आहेत. तसेच सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु असून ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करतांना सतर्क रहावे, असे आवाहन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी केले आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस सेलचे प्रभारी हेमंत पाटील, पोहेकॉ चंद्रशेखर बडगुजर, पोना/हितेश पाटील, पोकों/विजय गावीत, किरण जिरेमाळी, प्रदीप पावरा, पवन पाटील, राहूल तडवी, सुभाष वळवी, देविदास महाले यांनी केली आहे.