नंदुरबार l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शहादा नगरीत श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी नंदुरबार आगारातून सुस्थितीतील आणि चांगल्या ज्यादा बसेस सोडण्याची मागणी प्रवासी महासंघाच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे.
ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी संचलित महाराष्ट्र ग्राहक पंचायतच्या नंदुरबार प्रवासी महासंघातर्फे आगार प्रमुख संदीप निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवार दि. 1 ते 5 एप्रिल दरम्यान शहादा येथे पाच दिवसीय शिव महापुराण कथा होणार आहे.
या भव्य दिव्य कथेसाठी नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती राहणार आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातून थेट कथास्थळापर्यंत ज्यादा बसेस सोडण्याची मागणी प्रवासी महासंघातर्फे करण्यात येत आहे. भाविकांची गर्दी आणि प्रवाशांच्या संख्येनुसार नंदुरबार शहादा बस फेऱ्या वाढवण्याची गरज आहे.
चालक वाहकांचीही पुरेशी संख्या उपलब्ध करून कथाकाळात भाविकांना एसटीच्या सेवेचा लाभ होणे आवश्यक आहे. अशी मागणी नंदुरबार प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जैन, नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, अपेक्षा चव्हाण,ज्येष्ठ सदस्य बी.डी. गोसावी, योगेश्वर जळगावकर, गणेश ढोले, अशोक यादबोले,वैभव करवंदकर, जगदीश ठाकूर यांनी केली आहे.