नंदुरबार l प्रतिनिधी-
प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकलश प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदनगरीत येत असून या निमित्ताने १००१ दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचा भव्य महाआरती सोहळा आज रविवार दि. ०९ मार्च २०२५ रोजी पार पडणार आहे; अशी माहिती देतानाच हा २१ व्या शतकातील दुर्मिळ योग असून नंदनगरीच्या इतिहासात प्रथमच असा सोहळा पार पडणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मा. आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.
खोडाई माता रस्त्यावरील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आवाहन केले. या प्रसंगी त्यांच्या समावेत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर विक्रांत मोरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील, माजी नगरसेवक चारूभाऊ कळवणकर, प्रशांत चौधरी, युवा नेते प्रथमेश शिरीष चौधरी, सुभाष पानपाटील, अनुगामी लोकराज्य महा अभियान म्हणजे अनुलोमचे अॅड. प्रितम प्रविण निकम (नंदुरबार लोकसभा जनसेवक,), भाजयुमोचे निलेश चौधरी व अन्य उपस्थित होते.
आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पुढे सांगितले की, अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून आम्हाला त्यात सहभागी करून घेतले व प्राधान्य दिले म्हणून त्यांचे आभार मानतो. प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकलश प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदनगरीत येत असून या निमित्ताने १००१ दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचा भव्य महाआरती सोहळा दिनांक ०९ मार्च २०२५, रविवार, सायं. ७ वा. पोलीस कवायत मैदान, नेहरु पुतळा जवळ, नंदुरबार येथे संपन्न होईल.
त्याचबरोबर प्रयागराज संगमतीर्थ गंगाजल पाण्याच्या १ लाख बाटल्यांचे नंदनगरी वासियांना वितरण देखील केले जाईल. गंगाजल च्या बाटल्या कार्यक्रम स्थळी न देता घरोघर जाऊन प्रत्येक परिवाराला एक बॉटल प्रमाणे दिल्या जातील असे ते म्हणाले.
या सोहळ्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अविनाशजी जोशी (भागवत कथाकार, नंदुरबार) तसेच श्री. स्वानंदजी ओक (अनुलोम, महाराष्ट्र राज्य प्रमुख) हे लाभले आहेत. तरी नंदनगरीतील समस्त जनतेची उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन मा. आदिवासी विकास मंत्री तथा आमदार, डॉ. विजयकुमार गावीत , अमळनेर विधानसभेचे मा. आमदार शिरीष चौधरी, जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे , अमोल गायकवाड (उत्तर महाराष्ट्र विभाग जनसेवक, अनुलोम) आयोजक अॅड. प्रितम प्रविण निकम (नंदुरबार लोकसभा जनसेवक, अनुलोम) संदिप ढोले (नंदुरबार विधानसभा भाग जनसेवक, अनुलोम) यांनी केले.