नंदुरबार l प्रतिनिधी
सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील केलापाणी व लेगापाणी येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी 5 तासाची पायपीट करीत ग्रामस्थांची भेट घेत चर्चा केली. दरम्यान गावातील पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत.रस्ता तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. त्यामुळे स्वातंत्र्याचा 78 वर्षानंतरही सातपुड्यातील दुर्गम भागातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत राजकीय नेत्यांमध्ये उदासीनता दिसून येते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या कृतीमुळे दुर्गम भागातील नागरिकांचा चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
21 व्या शतकात विविध विकासाच्या गप्पा मारण्यात येतात. मात्र सातपुड्यातील आदिवासी बांधव स्वातंत्र्याला 77 वर्ष तर नंदुरबार जिल्हा निर्मितीला 27 वर्षे उलटले तरीही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील केलापाणी हे साडेपाचशे लोकसंख्येचे गाव. या ठिकाणी जाण्यासाठी अद्यापही रस्ता नाही. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ पासून काही किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. येथील महिलांना आरोग्य,पाणी आदी गोष्टींसाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. केलापाणी गावात आजही रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईची तीव्र झळा पाहायला मिळत आहेत. चक्क हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना चार ते पाच किलोमीटर पर्यंत डोंगरवाटातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. साधारण 200 फूट खोल दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचे पाणी आणावं लागत असल्याचं दुर्दैवी विदारक चित्र सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये पाहायला मिळत आहे.गावाला रस्ता नसल्याने एका आदिवासी महिलेचे घरी प्रस्तुती करण्यात वेळ आली.मात्र प्रस्तुती दरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना देखील केलापाणी येथे घडली होती.
या पार्श्वभूमीवर या भागात आरोग्य, रस्ते, वीज आणि पाणी पुरवठ्याची समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी या दोन्ही ठिकाणी भेटी देण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी तोरणमाळ येथे मुक्काम करून रात्री उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालय, तसेच शैक्षणिक दालनांना भेटी देत आढावा घेतला होता. दरम्यान शनिवारी सकाळी त्यांनी 5 किलोमीटर पायी प्रवास करून ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.या भेटीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केलापाणी याठिकाणी गावठाण निर्मिती करण्याबाबत वन विभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांना सूचित केले.
गावठाण तयार झाल्यास याच ठिकाणी आरोग्य केंद्र, पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी एकाच जागी निर्माण करण्याचे निश्चित केले, तसेच याठिकाणी वीजपुरवठा करण्यासाठी खांब टाकण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यांच्या सूचनेनंतर विविध विभागांकडून कामकाजाला मंजुरी देत वन विभागाने जागा उपलब्ध करून तातडीने काम सुरू करण्याचे निश्चित केले आहे. गावठाण निर्मिती झाल्यास सर्व सुविधा देणे शक्य होणार आहे.
*डोंगरदऱ्यातून 5 तास पायपीट*
धडगाव तालुक्यातील अनेक गावांना अद्याप जाण्यासाठी रस्ता नाही.जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या डोंगरदऱ्यातून पाच तास पायपीट करीत
ग्रामस्थांसोबत चर्चा करून समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. अधिकारी वर्गाने तब्बल पाच तास पायपीट करत केलापाणी ते लेगापाणीदरम्यान डोंगर दऱ्यांमध्ये निवास करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या भेटी घेत माहिती जाणून घेतली.