नंदुरबार l प्रतिनिधी-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त 19 फेब्रूवारी, 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राज्यव्यापी “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभासी संबोधनातून सकाळी 7.30 वाजता जिल्ह्यातील कार्यक्रम सुरु होईल व पदयात्रेचा प्रारंभ 8.30 वाजता होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) गोविंदा दाणेज यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
नंदुरबार शहरात ही पदयात्रा डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल येथून सुरू होत अंधारे चौक – नगरपालिका – नेहरू पुतळा – गांधी पुतळा – शास्त्री मार्केट – अंधारे चौक – छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापर्यंत येऊन थांबेल.
जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, सर्व प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांची पत्नी, आई व वडील, स्थानिक प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतर मान्यवर आणि नागरिक या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
या पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व प्रेरणादायी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाचा सन्मान करण्यासाठी मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनामार्फत उपजिल्हाधिकारी श्री. दाणेज यांनी केले आहे.