नंदुरबार l प्रतिनिधी-
इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच सायबर सुरक्षेचे महत्त्व अधिक वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), नंदुरबार यांच्या वतीने सुरक्षित इंटरनेट दिन निमित्त जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये सायबर सुरक्षितता, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय आणि डिजिटल साक्षरतेवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) गोविंद दाणेज , जिल्हा सूचना अधिकारी सुरेंद्र पाटील, तहसीलदार (महसूल) जगदीश भरक तसेच जिल्हा प्रशासन, पोलिस सायबर सेल, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यशाळेत NIC तर्फे सायबर सुरक्षा, ऑनलाइन व्यवहारांतील सावधगिरी, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, गोपनीयतेचे महत्त्व आणि डिजिटल फसवणुकीपासून बचाव यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले “इंटरनेटचा जबाबदारीने वापर करणे आणि सायबर सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. बालक, महिला आणि युवकांनी ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जागरूक राहून स्वतःचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” असे या कार्यशाळेतील तज्ज्ञांनी सांगितले.
*डिजिटल साक्षरतेचा प्रचार*
“Together for a Better Internet” या जागतिक संकल्पनेवर आधारित या उपक्रमांतर्गत राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती केली जात आहे.
नागरिकांनी सायबर सुरक्षेचे नियम पाळावेत. संवेदनशील माहिती कोणासोबतही शेअर करू नये. फसवणुकीच्या ई-मेल आणि लिंकपासून सावध रहावे. सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा.
अशा प्रकारे माहिती तंत्रज्ञान विभागाने सर्व नागरिकांना इंटरनेट सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आणि सायबर सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.