नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 संदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे.
दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी पुण्यातील एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये एमपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्या असल्याचा दावा करण्यात आला होता. या वृत्तामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या वृत्ताचा पूर्णतः इन्कार केला असून हे वृत्त बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट केले आहे.
*प्रश्नपत्रिका सुरक्षित; कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका !*
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ने स्पष्ट केले आहे की, सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसून उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे. याशिवाय, प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध नाही. काही परीक्षा केंद्रांवरील उमेदवारांना प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा गैरसमज निर्माण झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
अफवांपासून सावध राहा; अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवार आणि पालकांना गैरसमज पसरवणाऱ्या वृत्तांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अधिकृत माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी आयोगाच्या secretary@mpsc.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा. याशिवाय, अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा
एमपीएससी परीक्षेतील सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत सुरक्षित पद्धतीने संरक्षित आहेत. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा आणि अफवांना बळी पडू नये. उमेदवारांनी आत्मविश्वास ठेवा, अफवांपासून सावध राहा आणि आपल्या परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा !