नंदुरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील एकूण 2,94,195 शिधापत्रिकांना किमान एक मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानांत तेथील ई-पॉस मशीनद्वारे केले जात आहे. सदर सुविधा रास्तभाव दुकानातील लाभार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध असल्याचे जिल्हा पुरवठा गणेश मिसाळ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शिधापत्रिकांना किमान एक मोबाईल नंबर जोडण्याचे काम सुरु असून जिल्ह्यात अक्कलकुवा (93.83%), अक्राणी (87.04%), नंदुरबार(97.92%), नवापूर(95.47%), शहादा(95.81%), तळोदा(98.04%) याप्रमाणे एकूण 95.22% शिधापत्रिकांना किमान एक मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम झाले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले मोबाईल क्रमांकावर त्या शिधापत्रिकेला देय धान्याबाबत संदेश दरमहा शासनामार्फत पाठविण्यात येतो. त्यात सदर शिधापत्रिकेचा 12 अंकी क्रमांक, देय गहू, तांदूळ, भरडधान्य तसेच त्यावर आकारण्यात येणारे शुल्क (सध्या निशुल्क आहे) व PDS हेल्पलाईन क्रमांक इ. बाबत तपशिल समाविष्ट आहे.
जिल्ह्यात अद्याप 14,060 शिधापत्रिकांना किमान एक मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम प्रलंबित आहे. अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील नो नेटवर्क क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध झाले आहे. त्यानुसार आता अतिदुर्गम क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांना मोबाईल क्रमांक जोडणीचे काम सुरु आहे. मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत तेथील ई-पॉस मशीनद्वारे केले जात आहे. सदर सुविधा रास्तभाव दुकानात लाभार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील ज्या शिधापत्रिकाधारकांची मोबाईल क्रमांक जोडणी प्रलंबित आहे अशा लाभार्थ्यांनी आपल्या रास्तभाव दुकानातून 31 डिसेंबर 2024 पावेतो मोबाईल क्रमांक जोडणी करून घ्यावी तसेच आपल्या शिधापत्रिकेला मोबाईल क्रमांक जोडणी प्रक्रिया झाली आहे किंवा नाही याबाबत आपल्या रास्तभाव दुकानदाराकडून खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मिसाळ यांनी केले आहे.
*लाभार्थ्यांचा असा संदेश प्राप्त होतो*
“आपल्याला माहे सप्टेंबर,२०२४ करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे RCID-272028671605, गहू ६ कि.ग्रॅ.,तांदूळ ० कि.ग्रॅ.,उडीद डाळ ० कि.ग्रॅ.,मका ० कि.ग्रॅ.,ज्वारी ० कि.ग्रॅ.,बाजरी ० कि.ग्रॅ.,नाचणी ० कि.ग्रॅ.,फोर्टिफाइड तांदूळ ९ कि.ग्रॅ. अन्नधान्य भारत सरकारच्या निर्णयानुसार नि:शुल्क/मोफत अनुज्ञेय आहे. धान्य घेतल्याची पावती आवश्य घ्यावी. पीडीएस हेल्पलाइन क्र.१८००२२४९५० व १९६७.”