नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्ह्यातील सर्व अनाथ बालकांना शासन आपल्या सोबत साथी अभियानाच्या संकल्पनेच्या माध्यमातून अनाथ प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार असून यासाठी सर्व अनाथ बालक- बालिका यांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात 30 नोव्हेंबर, 2024 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विनोद वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत अनाथ बालक बालिका यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा,
या उद्देशाने एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्यात आलेले असून त्यानुसार ज्या बालकांचे वयाचे 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांच्या आई-वडीलांचा मृत्यु झालेला आहे अशा अनाथ बालकांना विभागीय उप आयुक्त यांचेमार्फत अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच ज्या बालकांचे आई-वडीलांचा मृत्यु झालेला आहे व त्यांचे पालनपोषण संस्थेबाहेर नातेवाईकांकडे झालेले आहे अशा अनाथ बालकांना संस्थाबाह्य या प्रवर्गातून तसेच ज्यांचे पालनपोषन शासन मान्यता प्राप्त संस्थामध्ये झालेले आहे.
अशा अनाथ बालकांना संस्थात्मक या प्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्री. वळवी यांनी शासकीय प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे.