नंदुरबार l प्रतिनिधी-
मिळवलेल्या ठेकेदारीतून यांना गटारी रस्त्यांचे धड नीट काम करता आलं नाही ते मतदारांना आज जिल्हा विकासाची हमी देतात आणि आमच्या विकास कामावर प्रश्न करतात, याचं मतदारांमधूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण आम्ही तीस वर्षात काय केलं त्याचा लेखाजोखा लोकांना तोंडी पाठ आहे. जिल्हा निर्मिती केली, रस्ते धरण बंधारे पूर्ण करण्याबरोबरच शेती विकास केला. हे करत असतानाच शेतकऱ्यांना गायी, बकऱ्या दिल्या, महिलांना गृह उद्योग दिले, गरिबांना घरे दिली, इतकच नाही तर भांडे गॅस सुरक्षा संच हे पण आमच्या प्रयत्नांमुळे लोकांना सरकारकडून मिळाले. हे सर्व मतदारांना माहिती आहे त्यामुळे आम्ही तीस वर्षात काय केलं असा प्रश्न करणाऱ्या विरोधकांना लोक निश्चितच जागा दाखवतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांनी या कॉर्नर सभांमधून बोलताना व्यक्त केला.
सावळदा, अनरद, वरुळ, कानडी, बिलाडी, बामखेडा, कवठळ, कुवद, पुसनद आणि अन्य गावांमधील मतदारांशी संपर्क साधला तसेच कॉर्नर सहभाग घेऊन आपली भूमिका मांडली त्याप्रसंगी ते बोलत होते. भाजपा महायुतीचे उमेदवार मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या शहरातील प्रचार फेऱ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील प्रचार फेऱ्यासुद्धा लक्षवेधी ठरत आहेत. विविध प्रकारची निवडणूक गीते, जागो जागी फडकणारे भगवे झेंडे, लाडक्या बहिणीं प्रमाणेच युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, त्या त्या भागातील मान्यवरांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह मान्यवरांचे होणारे उत्स्फूर्त स्वागत हे या रॅलीचे मोठे वैशिष्ट्य ठरले.
दरम्यान, पुढे भाषणात डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले, विकास कार्यात त्याचप्रमाणे राजकारणात योगदान असलेला तुल्यबळ उमेदवार आमच्या विरोधकांना देता आलेला नाही केवळ भ्रष्टाचाराचे गणित ठेवून ते प्रत्येक कृती करतात हे पुन्हा स्पष्ट झाले. काँग्रेसच्या नेत्यांनी तुमची केवळ दिशाभूल केली. भूलथपा देत गेले. दर महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट दिले जातील असे म्हणाले होते. तुम्हाला खटाखट पैसे मिळाले का? त्याच्या उलट मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार आपल्या शब्दांवर ठाम आहे भूमिकेवर ठाम आहे. मोदी सरकारने सांगितले होते आरक्षण हटवणार नाही सत्ता आल्यानंतर त्यांनी आरक्षणाला धक्का लावलेला नाही आणि याच्यापुढेही लागणार नाही.
राज्यातील महायुती सरकार लाडक्या बहिणींना पैसे देत आहे, पिक विमा विज बिल माफी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत आहे त्याच्या व्यतिरिक्त गावागावात पाणी योजना रस्ते वीज दिली जात आहे. म्हणून यापुढे मतदारांनी भुलथापांना बळी पडू नये; असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले. लोकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास यापुढेही चालू राहील आणि त्या कामाच्या बळावर निश्चितच आमचा विजय होणार आहे; असाही विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.