नंदुरबार l प्रतिनिधी
यंदा रमा एकादशी, द्वादशी आणि गोवसु बारस सोमवारी एकाच दिवशीआल्याने येथील श्री द्वारकाधीश मंदिरात भल्या पहाटे काकड आरती निमित्त भाविकांचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला.
शहरातील हाट दरवाजा परिसरात परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांनी दोनशे एक वर्षांपूर्वी स्थापित केलेल्या श्री द्वारकाधीश मंदिरात कार्तिक मास निमित्त काकड आरतीचा धार्मिक उपक्रम सुरू आहे. सोमवारपासून दीपोत्सवास प्रारंभ झाला. सोमवारी एकादशी, द्वादशी आणि गोबारस असा त्रिवेणी योग आला. हे औचित्य साधून शहर व परिसरातील महिला भाविकांनी श्री द्वारकाधीश मंदिरात काकड आरतीसाठी हजेरी लावली.
यावेळी आबाल वृद्धांसह महिला, पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काकड आरती, मंगला आरती आणि विविध भक्ती गीतांनी मंदिर परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. दररोज सकाळी सहा ते साडेसहा वाजे दरम्यान काकड आरती होत असून मंदिराचे पुजारी प्रशांत जानी महाराज पौरोहित्य करीत आहेत. दि. 17 ऑक्टोबर पासून नियमितपणे सुरू झालेल्या काकड आरतीचा समारोप कार्तिक पौर्णिमा रोजी होईल. धर्मप्रेमी भाविकांनी दररोजच्या काकड आरती उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्री द्वारकाधीश मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.