नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा येथील सालदारनगरात जिवंत कासवाची विक्री करताना वनविभागाच्या पथकाने दोघा संशयितांना अटक केली आहे. दोघांच्या ताब्यातून दोन जिवंत कासवही जप्त करण्यात आले आहेत.
दोघा संशयितांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान मुंबई वनविभागाला जी माहिती मिळते ती माहिती स्थानिक विभागाला मिळत नाही हे न समजणारे कोडे आहे.
मुंबई येथील वनविभागाला शहादा येथे जिवंत कासवांची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती शहादा वनविभागाला देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने 13 सप्टेंबर रोजी जुना प्रकाशा रस्त्यावरील सालदारनगरात सापळा रचला असता याठिकाणी कासवाची खरेदी- विक्री होत असताना दिसून आले. अयाज आबिद अन्सारी (48, रा. आझाद चौक, शहादा) व रहीम अशफाक अन्सारी (50, रा. मराठा गल्ली, शहादा) अशी कासव विक्रेत्यांची ओळख पटल्यावर त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून कासव जप्त करण्यात आले. दोन्ही संशयित आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 18 सप्टेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
दोघांनी कासव नेमकं कोठून आणले, तसेच कोणाला विक्री करण्यासाठी आणले याची चौकशी करण्यात येत आहे. ताब्यात घेतलेले दोन्ही कासव हे ‘अ’ श्रेणीतील संरक्षित कासव असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. गुप्तधन आणि इतर अंधश्रद्धेमुळे या कासवांची विक्री करण्याचे प्रकार वाढल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सदरची कार्यवाही सहायक वनसंरक्षक एस. डी. साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा वनक्षेत्रपाल एस. बी. रत्नपारखे, अधिकारी गस्तीचे पथक व स्टाफ, चारुशीला काटे, वन्यजीव मित्र सागर निकुम, आर. बी. भोरे, ए. एन. तावडे, एस. एच पवार, प्रियांका बिरारे, वर्षा निकुंभे, अर्चना बिरारे, नितीन पाटील, वाहनचालक नईम मिर्झा, ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने केली.