अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील उंबिलापाडा येथे शेतात काम करीत असताना वीज पडून १५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला . तर चुलत बहीण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली . याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील येथील भगदरीचा संजयसिंग करमसिंग वळवी रा.उंबिलापाडा ता.अक्कलकुवा ( वय १५ ) हा युवक आपल्या आई आणि चुलत बहिणीसोबत शेतात मका काढणीचे काम करीत होता . त्यावेळी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली . त्यामुळे पाऊस आणि जागेवरच विजेपासून संरक्षण करण्यासाठी संजयसिंग आणि चुलत बहीण चंदना हे झाडाच्या आडोशाला उभे राहिलेत . त्याच वेळी झाडाजवळ अचानक वीज पडली . त्या विजेचा जोरदार झटक्याने संजयसिंग कोसळून बेशुद्ध झाला . तर चंदना ही जखमी झाली . विजेचा जोराचा आवाज आल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तत्काळ बेशुद्धावस्थेत ग्रामीण रुग्णालय मोलगी येथे उपचारासाठी येत होते . दरम्यान रस्त्यातच संजयसिंग करमसिंग वळवीचे दुर्दैवी निधन झाले . दवाखान्यात नेल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले तर जखमी असलेल्या चंदना भिका वळवी या चुलत बहिणीवर मोलगी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले . चंदना हिच्या डोक्याला झटका बसला असल्याने तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलवण्यात येत होते . करमसिंग वळवी यांनी दिलेल्या माहितीवरून मोलगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . तपास पो.हे. काँ धनराज जाधव करीत आहेत .








