नंदुरबार l प्रतिनिधी –
चंदनपुरी येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या वाहनाला झालेल्या अपघाताची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर. विजयकुमार गावित यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्त भक्तांची भेट घेतली आणि सांत्वन केले.
याविषयी अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील ओसरली गावातील भक्तगण मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे देवदर्शनासाठी 17 ऑगस्ट रोजी जात असताना पहाटे पाच वाजेच्या सुमारास घोटाने न्याहली गावादरम्यान वळणावर वाहन उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनातील दहा ते बारा जण जखमी झाले आहेत. पैकी तीन प्रवासीभक्त जायबंदी झाले असून त्यांच्या पायांना गंभीर इजा झाल्या आहेत.
गंभीररित्या पायाला इजा झाल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी बारा वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या जखमी प्रवाशांची जिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली तसेच त्यांचे सांत्वन केले उपचाराकरिता हवी ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. त्यांच्यासमवेत प्रमुख वैद्यकीय अधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.