नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार विधानसभा क्षेत्राचा आमदार आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष या नात्याने नंदुरबार तालुक्यातील 59 हजार आणि शहादा तालुक्यातील 25 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज मी मार्गी लावले असून त्यांच्या खात्यावर पैसे पडणे सुरू झाले आहे, परंतु जे आमदार नाहीत हे सुद्धा आम्ही मंजूर करून आणले असं सांगत सुटले आहेत. तेव्हा; आम्ही मंजूर केले सांगणाऱ्या लबाडांच्या भुलथापांना बळी पडू नका; असे आवाहन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ जिल्हा परिषद गटातील तसेच रजाळे परिसरातील सुमारे 3000 लाभार्थ्यांना गृहपयोगी वस्तुसंचांचे आणि सुरक्षा संच पेटींचे वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाला भाजपाचे तालुकाध्यक्ष जे एन पाटील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, रविन्द्र गिरासे, मुन्ना पाटील, आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरात देखील शहरातील लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन गृहपयोगी वस्तू संच आणि सुरक्षा संच पेटी वाटप करण्यात आले.
नामदार डॉक्टर विजयकुमार गावित भाषणात पुढे म्हणाले, राज्य शासनाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यातील कामगारांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी मंडळ वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. कामगारांनी आपल्यासाठी उपयुक्त अशा योजनेचा अवश्य लाभ घ्यावा,
राज्यातील कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब कामगाराला पत्नीच्या प्रसूतीदरम्यान हॉस्पिटल चा खर्च करणे शक्य नसते व त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कामगार मंडळामार्फत कामगाराच्या पत्नीस नैसर्गिक प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. आपत्कालीन मदत: अपघात, आजार, मृत्यू इत्यादींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण, रुग्णालये, औषधे आणि आरोग्य विमा यांसारख्या आरोग्य सुविधा, कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण सहाय्य,कामगारांसाठी स्वस्त निवास सुविधा, निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न, कर्ज, प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षा इत्यादींसारख्या इतर सुविधा या मंडळामार्फत दिल्या जात असल्याचेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाल्या, बांधकाम क्षेत्र तसेच इतर क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे त्यांची मिळकत कमी असते आणि त्यामुळे ते आपल्या पाल्याना शिक्षणासाठी परदेशात पाठविण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे विद्यार्थी परदेशात शिक्षण पूर्ण घेण्यापासून वंचित राहतात त्यामुळे कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या पाल्यांना परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.