नंदुरबार l प्रतिनिधी
निनादणाऱ्या ढोल पथकांच्या गजरात राज्यभरातून आलेल्या पथकांनी पारंपारिक आदिवासी नृत्यांचा अविष्कार करीत काढलेल्या भव्य आदिवासी गौरव रॅलीने समस्त नंदुरबार जिल्हा वासियांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी गौरव रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान तारपा हे आदिवासींचे पारंपारिक वाद्य वाजविण्याचा आनंद घेत मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी रॅलीचा शुभारंभ अधिक देखणा बनवला.
दिनांक 9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जाणार असून नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प आयोजित “९ ऑगस्ट जागतीक आदिवासी गौरव दिवस” सलग दोन दिवसापासून साजरा केला जात असून आदिवासी संस्कृती आणि आदिवासींच्या पारंपारिक कला यांचे विलोभनीय सादरीकरण केले जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी भव्य आदिवासी गौरव रॅली काढण्यात आली. प्रारंभी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी चंद्रकांत पवार, तळोदा प्रकल्पाचे अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नतिशा माथुर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी निर्मल माळी, प्रकल्प कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी काकडे, तळोदा येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम राठोड आणि अन्य सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. रॅलीमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेले महाविद्यालयीन कलापथके आणि संस्कृती कार्य करणाऱ्या कलाकारांचे पथक सहभागी झालेले होते. विश्व आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर शंभरहून अधिक कलापथक नंदुरबार येथे आले असल्याची माहिती देण्यात आली.
*पारंपारिक वाद्य नृत्य रॅलीचे ठरले आकर्षण*
दरम्यान, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात नंदुरबार शहरातील नेहरू चौकापासून नगरपालिका मार्गे प्रमुख बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात रॅली पार पडली. आदिवासींचे पारंपारिक वाद्य तारपा, घुंगरू आणि सुकलेले भोपळे कंबरेला बांधून नृत्य करणारे बुद्या-बावा, मोरपिसांचे सुंदर टोप घालून घेर धरणारे तरुण कलाकार आणि सुंदर नृत्य अविष्कार करणाऱ्या तरुणी या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले.