नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा कामगार सुविधा केंद्र, नंदुरबार येथे बांधकाम कामगारांचे नोंदणी कार्ड वितरण व नूतनीकरणासाठी तालुकानिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी, धुळे मधुरा सुर्यवंशी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
सरकारी कामगार अधिकारी, धुळे या कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र, नंदुरबार येथे बांधकाम कामगाराची नोंदणी कार्ड वितरण व नूतनीकरणाचे कामकाज चालते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक या निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे नोंदणी कार्ड वितरण व नूतनीकरणाचे कामकाज बंद करण्यात आले होते. तथापि, हे कामकाज 8 जुलै 2024 पासून पुन्हा नियमितपणे सुरु करण्यात आले असून कामकाज सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार हे एकाच वेळी कार्ड घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
बांधकाम कामगारांची गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा कामगार सुविधा केंद्र, प्लॉट नं. 67/68 अंबिका कॉलनी, शारदा नगर, नंदुरबार कार्ड वितरण, पावती, नूतनीकरण करण्यासाठी तालुकानिहाय महिन्याच्या प्रत्येक वाराचे नियोजन करण्यात आलेले आहे. सोमवार नंदुरबार, मंगळवार शहादा, बुधवार धडगांव व नवापूर, गुरुवार तळोदा तसेच शुक्रवारी कार्यालयीन कामकाजासाठी राखीव आहे, असे श्रीमती सुर्यवंशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.