नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील असंख्य बेरोजगारांना रोजगार मिळावा व स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावं यासाठी लवकरच 1200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ‘जेआरएन फार्मा’ या औषध निर्माण मेगा प्रकल्पाची उभारणी करण्यात येऊन 3 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून, विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
महायुती सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातील योजनांची माहिती देण्यासाठी माजी आमदार रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे उपस्थित होते.नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील एमआयडीसीमध्ये उद्योग उभारणीच्या मेगा प्रकल्पाबाबत त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांना औषध निर्माण कंपनी उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार,उद्योग व ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाकडून निश्चित भांडवली गुंतवणुक पातळीच्या आधारावर प्रोत्साहन धोरण 2019 च्या पॅकेज योजनेअंतर्गत मेगा प्रकल्प प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
*महिलांनाही रोजगाराच्या संधी*
प्रस्तावित औषध निर्माण मेगा प्रकल्पात जिल्ह्यातील असंख्य महिलांना देखील रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातून असंख्य कुटुंब रोजगारासाठी शेजारच्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यात स्थलांतर होत असतात. ‘जेआरएन फार्मा’ या औषध निर्माण मेगा प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने स्थलांतराचे प्रमाण थांबणार असल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
धुळे विधानसभा मतदारसंघासाठी माझं नाव चर्चेत आहे.मी विधान परिषदेसाठी इच्छुक आहे असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य राहील. असे शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.