नंदुरबार l प्रतिनिधी
आज ज ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात प.खा.भिल्ल सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.जयंत गणपत नटावदकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
आदिवासी समाजाच्या शिक्षणासाठी कै.जयंतराव नटावदकर यांनी आपले आयुष्य वेचले . स्वातंत्र्य पूर्व काळात धडगाव,अक्कलकुव्यासारख्या अतिदुर्गम भागात त्यांनी कधी पायपीट करून तर कधी घोड्यावर प्रवास करून शिक्षणाची गंगा पोहोचवली.शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहे या माध्यमातून शिक्षणाचा चौफेर विस्तार केला.त्यामुळेच आज पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या कार्याचा विशाल वटवृक्ष साकारला आहे. असे वक्तव्य आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ गिरीष पवार यांनी केले.
कै बाबांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आज ज. ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात त्यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेवा फाऊंडेशन च्या अध्यक्षा व प्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ समिधा नटावदकर यांनी आज.कै.जयंतराव नटावदकर उर्फ बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या.
यावेळी कार्यक्रमास प्रा.एस.के.चौधरी, प्रा.एस.एफ.सोनार उपस्थित होते. डॉ.गिरीश पवार यांनी यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना कै.बाबांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. व त्यांचे जीवन चरित्र आदिवासी भागात , शैक्षणिक क्षेत्रात , समाजकारण, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी पाथेय ठरेल.असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन अन्नदाते यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.सौ.वर्षा घासकडबी यांनी केले.कार्यक्रमास सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीं तसेच प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहासभाऊ नटावदकर तसेच प्राचार्या सौ सुहासिनी नटावदकर यांचे मार्गदर्शन लाभले.








