नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीसाठी सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी निवडणूक क्षेत्रात मतदान करण्यासाठी दोन तासांची सवलत अथवा भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी म. ज. सुर्यंवशी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणूकामध्ये काही संस्था आस्थापना हे भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. यामुळे मतदारांना त्यांच्या मतदानापासुन वंचित रहावे लागते.
उद्योग व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांच्या मालकांनी या सुचनाचे योग्य पालन करावे. मतदारांकडून मतदानासाठी योग्य सुट्टी अथवा सवतल न मिळाल्याची तक्रार आल्यास संबंधितांना विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.
निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी हे कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असेही सरकारी कामगार अधिकारी, श्री. सुर्यंवशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.