नंदुरबार l प्रतिनिधी
बारामती येथील कंपनीच्या नावाने दामदुप्पट योजना सुरू करून व कंपनीचे एजंट बनून नंदुरबार जिल्ह्यातील २० पेक्षा जास्त जणांची फसवणूक करून तीन कोटी ८८ लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धवन पाटील फ्लॅट क्रमांक ५ हाइट्स कसबा , असा पत्ता असलेल्या एसपीव्हीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या नावाने एजंट बनून मदन जहागीर पाडवी (रा. जमाना, ता. अक्कलकुवा), कंपनीचे संचालक विकास दादा निकम (रा. खांडस सांगवी, ता. बारामती, जि. पुणे), सचिन डोंगरे (मु. पो., कलकी, ता. फलटण, जि. सातारा), प्रवीण दादा
निकम (खांडस सांगवी, ता. बारामती), एजंट छगन जहाँगीर पाडवी, रा. जमाना, ता. अक्कलकुवा), देवानंद खटावकर (नांदेड), अक्षय भाऊसाहेब गोमासे (कर्ज देणाऱ्या बँकेचा एजंट, रा. वासननगर, पाथर्डी फाटा, नाशिक), सय्यद अब्बास रेन (फायनान्शियल सर्व्हिस, रा. वाशी, मुंबई) यांनी संगनमत करून नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांशी संपर्क साधत ‘तुम्ही आमच्या एसपीव्हीएस ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा रक्कम मिळेल,’ असे आमिष दाखवून पैसे लुटले.
त्याला बळी पडून शशिकांत शिवाजी पराडके रा. दुधाळे शिवार, नंदुरबार यांनी ८६ लाख, उज्ज्वला शिवाजी पराडके रा. जुने धडगाव यांनी ६८ लाख ५० हजार, बानाजी रुस्तम पुढेवाड रा. मंगलदास पार्क, नवापूर यांनी ६७ लाख, उमेश शेषराव राठोड रा. अश्विनी पार्क, दुधाळे, नंदुरबार यांनी ६२ लाख ८७ हजार, अर्चना रामजी पाडवी रा. गिरीकुंज सोसायटी, नंदुरबार यांनी २५ लाख रुपये असे एकूण तीन कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये व त्यांच्या ओळखीच्या इतर सुमारे २० जणांकडूनही अशा प्रकारे रक्कम गुंतवून करून घेतली. ही रक्कम नोव्हेंबर २०२१ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत जमा केली. या रकमेचा दामदुप्पटचा कालावधी पूर्ण झाल्याने संबंधितांकडे गुंतवणूकदार मागणी करू लागले.
मात्र, संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे देणे, फोन न उचलणे, संपर्काच्या बाहेर जाणे असे प्रकार घडू लागल्याने, गुंतवणूकदार नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी नारसिंग फुलसिंग पाडवी रा. जमाना, ता. अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरून दिली. संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.