नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून केंद्रीय शैक्षणिक धोरणांचा तसेच केंद्रीय शैक्षणिक विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर आपल्या आदिवासी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना बळकटी कशी देता येईल त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत; असे महासंसदरत्न खा. डॉ. हिना गावित यांनी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत बोलताना सांगितले.
जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकांची बाबा रिसॉर्ट येथील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने सर्व संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, संस्थाचालक दीपक पाटील, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. बी.एस.पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया संस्थाचालक युवराज पाटील यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील संस्थाचालक शिक्षक आदि उपस्थित होते. यावेळी संस्था चालकांनी शैक्षणिक कार्यात येणाऱ्या अडीअडचणी व समस्या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.