नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक बंजारा तांड्याला महसुली दर्जा देण्यासाठी व स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून ही समिती बंजारा लमान तांडा घोषीत करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्यांना महसुली गाव घोषीत करणे तसेच ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करुन घेणे या अनुषंगाने कारवाई करणार आहे. असा महत्त्वाचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. दि.५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई येथे मंत्री मंडळाच्या बैठकीत संत सेवालाल महाराज बंजारा, लमान तांडा समृद्धी योजनेला मंत्री मंडळाची मान्यता देण्यात आली.
वरील बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या योजनेच्या माध्यमातून तांड्यात पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, आरोग्य, पथदिवे, गटार, अंतर्गत रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कामांसाठी किमान २५ लाख रुपयांचा निधी प्रत्येक तांड्याला उपलब्ध होणार आहे. यामुळे संत सेवालाल महाराज बंजारा समृद्धी योजनेच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या तांड्यांना संजीवनी मिळणार आहे.
वरील प्रस्तावित योजनेला राज्य शासनाची मान्यता मिळावी यासाठी अखिल भारतीय बंजारा क्रांती दजाच्यावतीने मागच्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना वर्षा निवासस्थानी ना.गिरीष महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण, कार्याध्यक्ष मधुकरराव राठोड, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भुषण पवार, महासचिव शरद राठोड, महिला आघाडीच्या पुजा राठोड, डॉ.गणेश चव्हाण, रामसिंग राठोड, शिवाजी चव्हाण यांच्यासह शेकडो पदाधिकार्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाला आश्वासित केले होते.
अलीकडे दि.२५ जानेवारी २०२४ सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलासह विविध सहा संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली झाली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी राज्यातील पाच हजार तांड्यांना महसुली दर्जा देवून स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी. व वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेच्या धरतीवर संत सेवालाल महाराज तांडा सुधार योजना लागू करण्यात यावी. या प्रमुख मागणीवर भर घातला होता.
यासह मागच्या वर्षी जामनेर तालुक्यात बंजारा लभाना नायकडा गोदरी महाकुंभ झाला होता. त्या महाकुंभाचे आयोजन सचिव आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी सुद्धा शासनाला वेळोवेळी बंजारा समाजाच्या व्यथा समजावून सांगितल्या होत्या. तसेच मागच्या हिवाळी अधिवेनात भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य निलय नाईक यांनी देखील राज्यातील तांड्यांना महसुल दर्जा देवून स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात याव्यात, यासाठी लक्षवेधी मांडली होती.
वरील सर्व घडामोडींच्या माध्यमातून आज महायुती सरकारने बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक प्रकारची महासंजीवनीच दिली आहे. या निर्णयामुळे भाजपाचे ज्येष्ठनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे बंजारा समाजाने विशेष आभार मानले आहेत. या निर्णयाचा श्रावण चव्हाण, जयंती राठोड, भावेश पवार, युवराज चव्हाण, प्रेम चव्हाण, चैत्राम राठोड, जितु पवार, रणजीत पवार, पुरुषोत्तम चव्हाण, देवा चव्हाण, रणजीत चव्हाण, शिवाजी चव्हाण, बदुलाल राठोड, पिंटू बंजारा, किसन पवार, डॉ.साईदास चव्हाण, राहुल राठोड यासह राज्यातील संपूर्ण बंजारा समाजाने या निर्णयाचा जल्लोषात पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला.