नंदुरबार l प्रतिनिधी
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदूरबार तालुक्यातील टोकरतलाव येथे तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या संपादित केलेल्या जमिनीवर पाणी क्षेत्रात भराव टाकून अतिक्रमित फार्म हाऊस चे जास्तीचे बांधकाम केले आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल इशारा उबाठा शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.
नंदुरबार येथे आमदार आमश्या पाडवी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख के.टी.गावीत, महानगर प्रमुख पंडित माळी आदी उपस्थित होते. यावेळी आमश्या पाडवी म्हणाले की, टोकरतळे ता.जि. नंदुरबार शिवारातील शेत सर्वे क्र. १२८ मधील क्षेत्र १०.११ आर हा सर्वे नंबर तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या मालकीचा आहे. याचा भूसंपादन प्रस्ताव क्र. १५/१९ शासन निवाडा दि. २१/०६/२००१ रोजी घोषित झाला आहे. सदर प्रकरणी शेत सर्वे क्र. १२८ मधील क्षेत्र ९०.९१ आर हे पूर्णतः क्षेत्र संपादित केलेले आहे.
हे संपादन करीत असताना जमिनीचे मालक बटेसिंग कन्हैयालाल रघुवंशी यांना मोबदला १२ लाख ६२ हजार ५८ रुपये अदा करण्यात आले आहे. याठिकाणी जमीन मालक यांचे वारस चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी जमीन परत मिळणेबाबत दि. ११/१२/२०२० रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री यांना दिलेल्या निवेदनानुसार झालेल्या चौकशीत रघुवंशी यांचे सुमारे २-३ एकरमध्ये अतिक्रमित वास्तू (फार्म हाउस) अस्तित्वात असलेबाबत जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकारी यांनी खात्री केलेली आहे. सदरची वस्तू ही पाणी क्षेत्रात भराव टाकून पूर्ण संचय पातळी (२३९,३० मी) पेक्षा जास्त उंचीवर बांधकाम केले असल्याची खात्री विभागाने केलेली आहे.
सदर प्रकरणी मुळ मालक यांचे वारस चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी नियमित दिवाणी न्यायालयात देखील दाद मागितली होती, परंतु न्यायालयाने सदर दावा दि. ०८/०७/२०१३ च्या निर्णयानुसार आदेश दावा खर्चासह नामंजूर करण्यात आला आहे. परंतु, अद्याप त्यांनी सदरच्या जमिनीवरचा ताबा सोडला नसल्याने त्याठिकाणी चंद्रकांत रघुवंशी यांचे अतिक्रमन असल्याचे एकंदरीत पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे. असे असतांना देखील शासनाने २०१३ पासून अद्याप सदरची जमीन ताब्यात घेतली नसल्याने दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्यावर देखील फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे, असे आ.आमश्या पाडवी यांनी सांगितले.








