नंदुरबार l प्रतिनिधी
येथील संजय स्मृती मंदिर ट्रस्ट संचलित लोकनेते स्व.बटेसिंगभैय्या रघुवंशी सभागृहाचे उद्घाटन व नामकरण सोहळा मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन तथा पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन तथा पालकमंत्री अनिल पाटील यांच्या जिल्हा दौरा जाहीर करण्यात आलेला आहे. सोमवार दि.१६ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३.३० वाजता धुळे रस्त्यावरील संजय स्मृती मंदिर ट्रस्ट संचलित लोकनेते स्व.बटेसिंगभैय्या रघुवंशी सभागृहाचे उद्घाटन व नामकरण सोहळा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंत्री अनिल पाटील पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच नंदनगरीत येणार असल्याने शिवसेना (शिंदे गट)वतीने त्यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. कार्यक्रमास विविध संस्थेतील पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.








