नंदुरबार l प्रतिनिधी
पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दिपमाला अविनाश भील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ढोल, ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला.
पंचायत समितीच्या स्व. हेमलाताई वळवी सभागृहात गुरुवारी सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार नितीन गर्गे होते. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या कालावधीत पाटोंदा गणाच्या सदस्या दीपमाला भील यांनी २ नामांकन अर्ज सादर केले.त्यांच्या अर्जावर सदस्य संतोष साबळे यांची अनुमोदन केले.
त्यानंतर दुपारी ३ वाजता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.प्राप्त दीपमाला भील यांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. दोन्ही अर्ज वैध ठरवण्यात आल्यानंतर माघारीची मुदत देण्यात आली त्यात एकमेव असल्याने पिठासिन अधिकारी तथा तहसीलदार नितीन गर्गे यांनी दीपमाला भिल यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड प्रक्रिये प्रसंगी विरोधी सदस्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
निवडीची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, रमेश गावित,शेतकरी संघाचे चेअरमन बी.के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी,जि.प सदस्य देवमन पवार,शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, पं.स माजी सभापती माया माळसे, जि.प माजी सदस्य अंबरसिंग पाडवी, शेतकी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, पं.स सदस्य अंजना वसावे, शीतल परदेशी,छाया पवार, कमलेश पाटील,संतोष साबळे,बायजाबाई भिल, सरपंच लक्ष्मण सूर्यवंशी,अविनाश भील,महिपाल गावित यांच्यासह कार्यकर्ते, व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यालया बाहेर घोषणाबाजी; ग्रामस्थांची गर्दी
निवडणूक प्रक्रियेनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,नूतन सभापती दीपमाला भील, उपसभापती प्रल्हाद राठोड यांनी पंचायत समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी नांदरखेडा, रकासवाडा, पातोंडा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वात तरुण सभापती
नंदुरबार पंचायत समितीच्या आतापर्यंतच्या कालावधीतील सर्वात कमी वयाच्या म्हणजेच २५ व्या वर्षात सभापती म्हणून निवडून आल्याचे ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.








