नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा व अक्कलकुवा येथे सिमेंट, लोखंड आदी बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे सेवा कर पथकाने (जीएसटी) कालपासून छापेमारी केली आहे. जीएसटी पथकांच्या छापेमारीने मात्र व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
व्यापाऱ्यांकडून मात्र सदरचा कर चुकविला जातो. यामुळे बऱ्याचदा सेवा कर पथकाच्या धाडी पडत असून सेवा कर चुकविणाऱ्यांना दणका दिला जातो. दरम्यान, काल नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा व अक्कलकुवा येथे सिमेंट, लोखंड आदी बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे जीएसटीच्या पथकाने छापेमारी केली आहे.
काही व्यापाऱ्यांनी सेवा कर चुकविल्याची चर्चा होती. यापार्श्वभूमीवर जीएसटी पथकाने व्यापाऱ्यांची तपासणी व पाहणी केली. बुधवारी व काल गुरुवारी दिवसभर पथकाकडून कसून चौकशी सुरु होती. खांडबारा येथे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनूसार, एका व्यापाऱ्याच्या घरात जीएसटी पथकाकडून तपासणी सुरु असतांना बाहेरुन आत जाणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला होता तर घरातून देखील प्रमुख व्यक्तींना बाहेर येण्यास मनाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नेमक्या या प्रकाराबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रसार माध्यमांशी बोलणे टाळले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. खांडबारा व अक्कलकुवा अशा दोन्ही ठिकाणी सात ते आठ व्यापाऱ्यांकडे जीएसटीच्या पथकाकडून तपासणी करण्यात आल्याचे समजले आहे.
काल बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची जीएसटी पथकाकडून चौकशी करण्यात आली असली तरी इतर व्यापाऱ्यांचेही धाबे दणाणले होते. अनेकांकडून भ्रमणध्वनीने एकमेकांशी संपर्क साधत नेमका प्रकार काय? याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.








