नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या पुढाकारातून तीन तालुक्यातील सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, तलाठी व वनपाल असे एकूण ११२१ प्रशिक्षणार्थी यांना सामुहिक वन हक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याच्या अंमलबजावणी साठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम २००६ नुसार तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील एकूण २३६ सामुहिक वन हक्क प्राप्त गावे आहेत. या तिन्ही तालुक्यातील आदिवासी यांच्या लाभासाठी, सामुहिक वन संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच वनांवर उपजीविका अवलंबून असलेल्या समाजाला शाश्वत साधन उपलब्ध करून देण्यासाठी सामुहिक वन हक्क व्यस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्या मार्फत सामुहिक वन हक्क क्षेत्राचे संवर्धन, संरक्षण, व्यवस्थापन व उपयोग करण्यासाठी आराखडा तयार करून गावातील लोकांना रोजगाराच्या संधी देण्याच्या उद्देश्याने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी तळोदा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात २३६ सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समित्यांचे गठन करून दुसऱ्या टप्प्यात त्यांची बँकेची खाते उघडण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण दिनांक २१ ऑगष्ट ते २६ ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात आले असून निपुण प्रशिक्षक म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका वन हक्क व्यवस्थापक रजनीगंधा घुगरे व यवतमाळ जिल्ह्यातील तालुका वन हक्क व्यवस्थापक अनुप जामोदकर हे होते.
प्रशिक्षणामध्ये सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे कार्य, आराखडा तयार करण्याची प्रक्रिया, ग्रामसभा व प्रशासन यांच्या सहभागाने शिवारफेरी, आराखडे तयार करण्यासाठी विविध शासकीय विभागाच्या भूमिका, गौण वनोपजाचे संकलन, विक्री व्यवस्थापन, वनातील जैवविविधता, सामुहिक वन हक्क व त्याचे संवर्धन व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले तसेच लेखा मेंढा व पाचगाव च्या यशोगाथा दाखविण्यात आल्या.
या प्रशिक्षणासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्र वाणी, प्रकल्प समन्वयक अमोल राठोड, गोविंदा साळुंके, जिल्हा व तालुका वनहक्क व्यवस्थापक प्रकाश गावित, विक्रम गायकवाड, दीपक पाडवी व प्रवीण गावित यांनी नियोजन केले.








