नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे प्रशासनातर्फे दूध भेसळ रोखण्यासाठी
18 दूध विक्रेत्यांच्या दूधाच्या नमुना घेण्यात आला.यात एकुण 9 दूध विक्रेत्यांच्या दुधात भेसळ आढळून आले.यावेळी 334 लिटर दूध नष्ट करण्यात आले.
नंदुरबार जिल्हयातील दूध भेसळ रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांचा अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यांत आलेली आहे. नंदूरबार जिल्हयात दूध भेसळ रोखण्याकरीता पोलिस प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन शास्त्र तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय
विकास अधिकारी यांनी समन्वय साधुन नियोजनबध्द व गोपनीयतेने संयुक्तीक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार आज नंदुरबार शहरातील देसाई पुरा, कोरीट नाका, मंगळ बाजार, टिळक रोड, धुळे रोड, तळोदा रस्तावर फेरीवाल्यांचा पाठलाग करुन तसेच इतर दूध वितरण केंद्रे व फेरीवाले यांच्याकडील दूधाची तपासणी मिल्क लोकटो स्कॅन या स्वयंचलित उपकरणाव्दारे करण्यांत आली.
सदरच्या धडक कारवाईमध्ये कार्यवाहीस्थळी तपासणीसाठी घेण्यांत आलेल्या एकुण 18 दूध विक्रेत्यांच्या दूधाच्या नमुन्यापैकी एकुण 9 दूध विक्रेत्यांच्या दूधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक रंग चव, कचरा, मृत किटक आढळुन आले. त्यामुळे भेसळयुक्त निकृष्ठ गुणप्रतीचे दूध सरासरी एकुण 334 लिटर (गाय दूध 251 लिटर व म्हैस दूध 83 लिटर) नष्ट करण्याची कारवाई तात्काळ करण्यांत आली. तसेच वैध मापन शास्त्र विभाग, नंदुरबार यांच्यासोबत संयुक्त पथकाव्दारे दूध मोजण्याची मापे, इलेक्ट्रॉनिक तोलन यंत्र यांचे मुद्रांकनाची पडताळणी करण्यांत आली असता, काही डेअरीतील मापांची व ईले. तोलन यंत्रांची पडताळणी-मुद्रांकनासह उल्लंघन केल्याचे आढळुन आल्याने वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 अन्वये 05 दूध विक्रेत्यांवर खटले नोंदविण्यांत आले आहेत.
सदरची कारवाई अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष धनंजय गोगटे व अपर पोलिस अधिक्षक मा. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, धुळे व नंदुरबार डॉ. अमित रमेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नंदुरबार डॉ. उमेश देविदास पाटील, निरीक्षक वैध मापनशास्त्र प्रशांत गडाख, अन्न सुरक्षा अधिकाररी आ. भा. पवार, क्षेत्रसहाय्यक वैध मापन शास्त्र एस. बी. सोनवणे, दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दूध योजना धुळे सतिलाल आत्माराम बोरसे, प्रितेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, विजय भदाणे, पोलीस प्रशासनामार्फत पोलीस नाईक अरविंद वळवी व पोलीस शिपाई रामेश्वर डोईफोडे तसेच वसुधारा दूध डेअरीतील दूध तपासणी तंत्रज्ञ निलेश शिंदे यांचे उपस्थितीत करण्यांत आली.
नैसर्गिक दूधात भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने यापढील काळात कठोर कारवाई करण्यांत येईल, याची नोंद घेण्यांत येऊन नागरिकांनी जागरूक रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








