नंदुरबार l प्रतिनिधी
सततच्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यातील भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात तब्बल १३०० रस्त्यांच्या माध्यमातून वाडे, वस्त्या, पाडे जोडले जाणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील १२ लाख आदिवासींना दिलासा मिळणार आहे. सदर योजने अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात १ हजार ६७२ कोटी रुपये खर्च असल्याचा अंदाज राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे. नंदुरबार येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
नंदुरबार जिल्ह्यात मुख्यत्वे करुन धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात रस्त्यांची समस्या बिकट आहे. यामुळे तेथील रहिवाशांना सेवा देतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी शासनाच्या योजनांची देखील प्रभावी अंमलबजावणी होत नाही. यामुळे या भागातील वाडे, वस्त्या, पाडे, गाव, सेवा देणाऱ्या शासकीय इमारती रस्त्यांनी जोडण्याचा मानस होता.त्यानुसार पाठपुरावा केला. राज्य शासनाने याची दखल घेत भगवान बिरसा मुंडा योजना नुकतीच जाहीर केली आहे. यास मंत्री मंडळाने मंजूरी देखील दिली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील १७ जिल्ह्यातील आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा असणार आहे. एकंदरीत राज्यात ६ हजार ८३८ कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील १२ लाख आदिवासींना होणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व आदिवासी पाडे रस्त्याने जोडण्यासाठी नवीन भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, या रस्त्यांसाठी आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र समिती असणार आहे, असे मंत्री डॉ.गावित म्हणाले.
सदर रस्त्यांच्या कामाला डिसेंबरच्या अर्थसंकल्पात मंजूरी मिळणार आहे. मंजूरी नंतर लगेच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यादरम्यान, वन विभागात ३:२ चे प्रस्ताव आल्यास त्वरीत मंजूरी देण्यात येणार आहे. नॉन प्लॅन रस्त्यांचा देखील यात समावेश असणार आहे. तसेच खासगी जमिनी अधिग्रहण करण्यासाठी देखील मंजूरी देण्यात येणार आहे. यामुळे सदर कामांच्या मंजूरी नंतर साधारण तीन वर्षांच्या कालावधी रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सदर कामांची देखरेख होणार असल्याचे डॉ.गावित म्हणाले.
भगवान बिरसा मुंडा रस्ते जोड योजने अंतर्गत सर्व आदिवासी वाडे, पाडे यांना बारमाही मुख्य रस्त्यांशी जोडणे, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व आठमाही रस्ते बारमाही करणे आणि आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळांना मुख्य रस्त्यांशी जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या योजनेमुळे आदिवासी जनतेस मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून अडचणी दूर होणार आहेत.