नंदुरबार l प्रतिनिधी
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, औषध, अवजारे, खते यांच्या पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतकऱ्यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरु करण्यात येत असून आज जिल्ह्यातील १३३ केंद्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी दिली.
यापुढे श्री.माळी म्हणाले की, पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरु करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, अवजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ वाचणार आहे. सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगाव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी केंद्रे आहेत. त्यांचे रुपांतर आता वन स्टॉप शॉपमध्ये होणार आहे.
देशभरात २ लाख ८० हजार खतांची किरकोळ विक्री करणारी दुकाने असून या खत विक्री दुकानांचे किसान समृद्धी केंद्रात टप्पटप्प्याने रुपांतर करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १३३ केंद्रांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. राजस्थानमधील सिकर येथून हा सोहळा संपन्न होणार असल्याचे श्री.माळी यांनी सांगितले. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य पंकज पाठक उपस्थित होते.








