नंदुरबार l प्रतिनिधी
मणिपूर राज्यात आदिवासी जन समुदायावर होत असलेल्या अत्याचारविरोधात आज बुधवार दि.२६ जुलै रोजी नंदुरबार जिल्हा बंदची हाक विविध संघटनांतर्फे देण्यात आली आहे.त्याला प्रतिसाद देत जिल्हयात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला.दरम्यान नंदूरबार व शहादा आगारातील बसवर तुरळक दगडफेकीच्या घटनेमुळे गालबोट लागला.

मणिपूर राज्यात मुळ आदिवासी समुदायावर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सामाजिक, राजकीय, प्रशासकीय अत्याचार सुरु आहे. त्यातच दोन आदिवासी महिलांवर झालेल्या घोर अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दोघा महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याने आदिवासी समुदायाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच आदिवासींवर अन्याय, अत्याचाराच्या विविध घटना देशभरात घडत आहेत.
आदिवासींचे आरक्षण खोट्या आदिवासींद्वारे पळविण्यात येत असून आदिवासींचे सांविधानिक हक्कावर अतिक्रमण करण्यात येत आहे. मणिपूर येथील अमानवीय दुष्कृत्य व अत्याचारचा जाहीर निषेध करण्यासाठी समस्त आदिवासी समुदायातर्फे आज बुधवार दि.२६ जुलै रोजी नंदुरबार जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व तालुके व बाजारपेठा बंद करण्याचे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले आहे.
त्याला जिल्हाभर प्रतिसाद मिळाला.जिहभरातील विविध प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आले.परिणामी जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
दरम्यान मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी नंदुरबार जिल्हा बंदची घोषणा केली होती शहादा तालुक्यात या बंदला हिंसक वळण लागले असून अज्ञात व्यक्तींनी परिवर्धा ते कलसाडी दरम्यान एसटी बसवर दगडफेक केल्याने या एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शहादा आगारातील बस सेवा प्रभावीत झाले होते.तर नंदूरबार आगारातील बसवर अज्ञाताने तालुक्यातील रनाळे गावाजवळ दगडफेक केल्याने नंदूरबार आगारातील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या.बंद दरम्यान कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी.मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.








