नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार योग्य किंमतीत कृषी निविष्ठा मिळण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आठ भरारी पथकांच्या माध्यमातून १८४ कृषी केंद्रांच्या तपासणी करण्यात आल्या आहेत. यातून बियाण्यांचे १५४, खते ६३ व किटकनाशकांचे २९ असे एकूण २४६ नमुने घेण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व योग्य वेळेत, योग्य किंमतीत कृषी निविष्ठा मिळण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागस्तरावर १, जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुक्यात १ याप्रमाणे ६ अशी ८ भरारी पथक कृषी विभागाने स्थापन केले आहेत. तसेच जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुणवत्ता निरीक्षकांमार्फत तसेच भरारी पथकांमार्फत काल अखेरपर्यंत खते ५६, बियाणे ९९ व किटकनाशके ३३ असे एकूण १८४ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच विविध कृषी निविष्ठांचे २४६ नमुने घेण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा मिळावी यासाठी कृषी विभाग खबरदारी घेत आहे.जिल्ह्यात ५२ हजार ७४१ मे.टन खत उपलब्ध खरीप हंगाम २०२३ साठी यूरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकूण ८७ हजार ९९० मे.टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. १९ जुलै अखेर जिल्ह्यात यूरिया खत २० हजार ५९८ मे.टन, डीएपी ३ हजार ७८५ मे.टन, एमओपी ३ हजार १७० मे.टन, एसएसपी ९ हजार ७८६ मे.टन व संयुक्त खते १५ हजार ४०२ मे.टन असे एकूण ५२ हजार ७४१ मे.टन खत उपलब्ध आहेत. जिल्ह्यासाठी कापूस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भूईमूग, तूर व उडिद आदी पिकांचे एकूण २३ हजार १६५ बियाणे उपलब्ध झाले आहे. तर कापसाचे ४ लाख ६० हजार पाकिटांचा पुरवठा झाला आहे.
कृषी निविष्ठा गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी कराव्यात, निविष्ठा खरेदी करतांना सील अथवा मोहोरबंद पाकिटे किंवा पिशव्या असल्याची खात्री करावी, बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटांवरील अंतिम मुदत पाहून घ्यावी, शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच व पक्क्या पावतीवर कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात, तसेच अनुदानित रासायनिक खताची खरेदी ई-पॉस मशिनद्वारेच करावी, कमी वजनाच्या निविष्ठा व पाकीटावरील छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री करत असल्याचे आढळल्यास शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश खरमाळे, मोहीम अधिकारी सचिन देवरे यांनी केले आहे.








