नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील राजकारणात सुरु असलेल्या मनमानी राजकीय घडामोंडीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सही संतापाची असे अनोखे आंदोलन केले. यावेळी मनसेने उभारलेल्या फलकावर असलेले घोषवाक्य वाचून राज्यातील घडत असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी नागरीकांनीही सही करुन आंदोलनात सहभाग नोंदविला.
सत्तेसाठी काय होईल आणि काय घडेल? याचे उदाहरण राज्यातील सत्तेत असलेल्या ट्रिपल इंजिनच्या सरकारने वर्षभरात केलेल्या घडामोंडींचे आहे. निवडणूकीतून मतदानाचा हक्क बजविणार्या मतदारांबाबत कुठलाही विचार न करता केवळ सत्तेसाठी राजकीय खेळ्या रंगू लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील राजकारणात सत्तेकरीता सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल सर्वसामान्य नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होवू लागला आहे.
आपले मत वाया तर गेले नाही ना, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे. म्हणुनच नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वसामान्यांच्या भावनांना मोकळीकता करुन देण्यासाठी एक सही संतापाची हे अनोखे आंदोलन केले. नंदुरबार येथील बसस्थानकाजवळ नंदुरबार जिल्हा मनसेने एक सही संतापाची असे फलक उभारुन राज्यातील राजकारणात घडत असलेल्या घडामोडीबाबत संताप व्यक्त करण्याकरीता फलकावर सह्या घेण्यात आल्या. या अनोख्या आंदोलनाला नागरीकांनीही प्रतिसाद देत फलकावर सह्या करुन सहभाग नोंदविला आहे.
याप्रसंगी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, आस्थापना सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल पाटील, नंदुरबार विधानसभा अध्यक्ष सुनिल कोकणी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, अनिल नेतलेकर, शहर उपाध्यक्ष राम ठक्कर, अशोक बिलाडे, विनोद वसावे, तुफान पवार, उमेश ठेलारी, प्रसिध्दीप्रमुख कल्पेश माळी, सिताराम भिल, मनोहर पाटील यांच्यासह मनसे सैनिक उपस्थित होते.








