नंदुरबार l प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे सरकार असतांना नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्याशी जुळवून घेतले नाहीयामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बऱ्याचदा डावलले गेल्याची भावना मनात निर्माण होत होती. मात्र, आता अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्याने राष्ट्रवादीची कामे थांबणार नाहीत. तसेच जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठीदेखील निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून येत्या काळामध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी चाय पे चर्चा या कार्यक्रमात व्यक्त केला.
डॉ.अभिजित मोरे यांनी चाय पे चर्चेचे आयोजन केले होते. यावेळी आगामी भूमिका स्पष्ट करत असतांना ते म्हणाले, अजितदादा पवार यांचा सत्तेत जाण्याचा निर्णय योग्यच होता. यामुळे आम्हीही अजितदादांसोबत जाणे पसंत केले. राज्यातील तीनही नेते हे लोकनेते असल्याने राज्याचा गतीने विकास होईल. निर्णय घेण्याच्या बाबतीत अजित पवार हे उजवेच आहेत.त्यांना नेहमीच बदनामीचा वाटेकरी व्हावे लागत होते. ते जातील अशी पुसटशी कल्पना होती. कार्यकर्त्यांनी कोठे जावे हा त्यांच्यासाठी वैयक्ति प्रश्न होता.असे असले तरी आपण कोणावरही दबाव न टाकता जिल्ह्यातील बहुसंख्य राष्ट्रवादी अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. उदेसिंग पाडवी यांनी शरद पवार यांना पाहून नाही तर एकनाथ खडसे यांच्याकडे पाहून शरद पवार यांच्या गटात राहणे पसंत केले.
दरम्यान, आता येत्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात जे पक्ष वाढविण्यासाठी सक्षम आहेत,अशांची नियुक्ती करण्यात येईल तर इतरांना पक्षातून डच्चू देण्यात येणार असल्याचे डॉ.मोरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मोहन शेवाळे, मोहन माळी, मधूकर पाटील,ॲड.अश्विनी जोशी, कमलेश चौधरी आदी मान्यवरांसह जिल्हयातील कार्यकर्ते उपस्थित होते.आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेना(शिंदे गट), भाजपा व अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी असे एकत्र मिळून लढणार आहोत.तसेच धडगाव-अक्कलकुवा व नवापूर अशा दोन मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे डॉ.मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.








