नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे बीएसएनएल, एमटीएनएल निवृत्तीवेतनधारकांचे पेन्शन रिव्हीजनच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करीत काळा दिवस पाळला.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1 जानेवारी 2017 पासून 5 लाख बीएसएनएल आणि एमटीएनएल पेन्शनधारकांचे पेन्शन रिव्हीजन करण्यास विलंब केल्याबद्दल बीएसएनएल, एमटीएनएल निवृत्तीवेतनधारकांच्या संयुक्त मंचास तीन टप्प्यांत आंदोलन करण्यास भाग पाडले आहे.
बीएसएनएल एमटीएनएल कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा केल्यानंतरच पेन्शन रिव्हिजन शक्य आहे, अशी नकारात्मक भूमिका सरकारने सुरुवातीला घेतली होती. वस्तुस्थिती अशी आहे की पेन्शन रिव्हिजनचा बीएसएनएल आणि एमटीएनएल च्या आर्थिक परिस्थितीशी कोणताही संबंध नाही कारण पेन्शन देण्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार उचलत आहे.
सरकारतर्फे डिओटीतून बीएसएनएल/एमटीएनएल मध्ये आलेल्या सेवानिवृत्तांच्या वेतनातून पेन्शन काॅन्ट्रिब्युशन वसुल केली आहे. पेन्शन काॅन्ट्रिब्युशन त्यांच्या कमाल वेतनश्रेणीवर आकारली गेली आहे. पेन्शनर्स असोसिएशनकडून सतत पाठपुरावा आणि संघर्षानंतर दूरसंचार विभागाने १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्व पेन्शनर्स संघटनांसोबत बैठक घेतली. या बैठकीत तत्कालीन सदस्य (सेवा) यांनी सांगितले की पेन्शन रिव्हीजन कर्मचार्यांच्या वेतनसुधारणेपासून विलग केली जाईल आणि ती तृतीय वेतन सुधारणा समितीनुसार लागू केली जाईल. मात्र 15 टक्क्यांऐवजी शून्य टक्के फिटमेंटच्या ऑफरला सर्व पेन्शनर्स संघटनांनी एकाच आवाजात कडाडून विरोध केला.
तेव्हा अधिकाऱ्याने उच्च अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून पेन्शन रिव्हीजनच्या फिटमेंट घटकावर पुनर्विचार करण्याचे मान्य केले.वारंवार पाठपुरावा करूनही, दूरसंचार विभाग त्यांच्या आश्वासनांचे उल्लंघन करून प्रक्रियेस जाणीवपूर्वक विलंब करत आहे. या परिस्थितीत बीएसएनएल/एमटीएनएल निवृत्तीवेतनधारकांच्या संयुक्त मंचाने आंदोलन करण्याचे ठरविले आहे.पहिला टप्पा: 6 जुलै रोजी काळा दिवस दिवस म्हणून पाळण्यात येईल.
दुसरा टप्पा: 31 जुलै 2023 रोजी जिल्हा स्तरावर आणि दूरसंचार लेखा नियंत्रक कार्यालयासमोर दिवसभर धरणे आयोजित करेल.
तिसरा टप्पा: मागणी पूर्ण न झाल्यास 21 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे पाच दिवसांचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. संयुक्त मंच सर्व बीएसएनएल-एमटीएनएल निवृत्तीवेतनधारकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे. कारण ते करा किंवा मराच्या स्थितीत आले आहे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जगन्नाथ बोरसे, राधेश्याम सोनार राजाराम निकम पी.आर.सोनवणे. ईश्वर तांबोळी,जी.के रघुवंशी आदि उपस्थित होते.








