नंदुरबार l
येथील अंनिस कार्यकर्ते श्रीमती राणी अक्षय बच्छाव व त्यांचे पती अक्षय नारायण बच्छाव या दाम्पत्याने देशातील विविध राज्यात सुमारे ७ हजार ५०० किलो मीटर मोटार सायकलीने प्रवास करुन बालमजुरी रोखण्याचा संदेश दिला. त्यांचा नुकताच नंदुरबार येथे गौरव करण्यात आला.
बालमजुरीच्या प्रतिबंधासाठी अर्थात त्या रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्यात. मात्र त्याला फारसे यश आले नाही. तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देखमुख यांनी सन २०१० मध्ये यासाठी स्वतंत्र अभियान सुरु केले होते. त्यानुसार शहरा-शहरात व ग्रामीण भागात याचा सर्व्हे झाला. तसा अहवाल एकात्मिक बालविकास विभागाने द्यावा, असे निर्देश असतांना दिलेला अहवाल निरंक दाखविला. मात्र परिस्थिती जैसे-थे निर्माण झाली.
म्हणून याचा लेखा-जोखा मांडत नंदुरबार येथील बच्छाव दाम्पत्याने सुमारे ७ हजार ५०० किलो मीटर मोटार सायकलीने प्रवास करुन बालमजुरी रोखण्याचा संदेश दिला. त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर यश देखील मिळाले. घरच्या अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत वाटेवरील खडतर प्रसंगांना तोंड दत राष्ट्रव्यापी बालमजुरी विरोधी चळवळ यशस्वी केल्याबद्दल बच्छाव दाम्पत्यांना राष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड तसेच भारत गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. अंनिसच्या झालेल्या पाक्षिक बैठकीत बच्छाव दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.








