नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या 5 वर्षांपासून बेटर कॉटन प्रकल्प हा धुळे व नंदुरबार जिल्ह्यात 527 गावामध्ये लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाऊंडेशनमार्फत राबवला जात आहे.
प्रकल्पाद्वारे 95000 कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना कापूस पिकातील विविध आधुनिक पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले जात आहे.
प्रकल्पाद्वारे जमिनीचे आरोग्य, पाणी व जैवविविधता व्यवस्थापन, रासायनिक खते व औषधांचा कमी वापर तसेच वातावरण बदलाशी अनुकूलन व महिला सक्षमीकरण यासारख्या विषयांवर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी केली जाते.
या विषयांचाच भाग म्हणून बेटर कॉटन संस्थेद्वारे आम्सटरडॅम- नेदरलँड येथे जागतिक परिषद आयोजित केली आहे.
भारतातील बेटर कॉटन शेतकरी प्रतिनिधी म्हणून धुळे तालुक्यातील देवभाने येथील सौ. सुरेखा संभाजी देसले सहभागी होणार आहेत. महिला शेतकरी म्हणून कापूस शेतीतील अनुभव व अवलंब केलेले छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल त्या परिषदेत मांडणार आहेत. त्यांच्यासह LHWRF च्या महिला कृषी मित्र रेखा सोनवणे, बोरिस पी.यू. या देखील सहभागी होणार आहेत. यासाठी संस्थेच्या प्रमुख तुषारा शंकर यांचे मार्गदर्शन व प्रकल्प व्यवस्थापक सुनिल सैंदाणे आणि टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.








