नंदूरबार l प्रतिनिधी
मागील महिन्यात केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा-2022 चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नंदुरबार येथील ड्रायफ्रुट व्यावसायिक जैनम महेंद्रकुमार जैन यांनी अवघ्या 25 व्या वर्षी भारतात 103 वी रँक घेवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे एक छोटेखानी सत्कार समारंभ आयोजीत करुन जैनम जैन यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जैनम महेंद्रकुमार जैन यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण नंदुरबार शहरातील चावरा इंग्लिश स्कुल येथे झाले असून 11, 12 वी चे पुढील उच्च माध्यमीक शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे येथून विज्ञान शाखेतून पूर्ण केले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी संख्याशास्त्र या विषयातून पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर जैनम जैन यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून देशसेवा करण्याचे ठरविले आणि त्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली. अभ्यास करुन पहिल्यांदा परीक्षा दिल्यानंतर त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले परंतु, अपयश आल्यामूळे खचून न जाता त्यांनी आत्मविश्वास दृढ ठेवून मेहनत व चिकाटीने अभ्यास सुरु ठेवला आणि पुन्हा प्रयत्न केले. मात्र पुढील दोन प्रयत्नांमध्ये देखील यश मिळाले नाही. तीन प्रयत्न करुन देखील यश मिळाले नाही म्हणून निराश न होता त्यांनी सातत्याने अभ्यास सुरुच ठेवला आणि चौथ्या प्रयत्नात अवघ्या 25 व्या वर्षी जैनम महेंद्रकुमार जैन यांनी देशात 103 वी रँक घेवून घवघवीत यश मिळविले.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे तीन टप्पे असून यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत यांचा समावेश होतो. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा ही 1750 गुणांची लेखी परीक्षा असते. यात एकुण 9 पेपर्स असतात, पंरतु त्यापैकी केवळ 7 पेपर्समध्ये मिळालेले गुण अंतिम गुणवत्ता क्रमवारीत समाविष्ट केले जातात. 250 गुणांचे 7 पेपर ज्याच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते व त्यानंतर 275 गुणांची मुलाखत घेतली जाते असे एकुण 2025 गुणांची ही
संपूर्ण परीक्षेचा खडतर प्रक्रियेचा टप्पा पूर्ण केल्यानंतर यश मिळते.जैनम महेंद्रकुमार जैन यांनी दिलेली केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा- 2022 मध्ये मुख्य परीक्षेत 1750 गुणांपैकी 804 गुण व मुलाखतीसाठी 275 गुणांपैकी 190 असे एकुण 994 गुण प्राप्त करुन भारतात 103 वी रँक घेवून उत्तीर्ण झाले आहेत.
देशाचे भविष्य घडवणाऱ्या युवा पिढीला प्रेरित करण्यासाठी तसेच नंदुरबार जिल्ह्याचे भारतात नाव लौकिक केल्यामुळे जैनम महेंद्रकुमार जैन यांचा सत्कार समारंभ करण्यात आला असे यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे वेळी अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.