नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील सिसा व कुंडल येथील दोन्ही अल्पवयीन मुलींचे होणारे बालविवाह रोखण्यात पोलीस दलाला यश आले आहे.
बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या “ऑपरेशन अक्षता” या उपक्रमासाठी 9022455414 हा हेल्पलाईन नंबर जिल्हा पोलीस दलाकडून सुरु करण्यात आला आलेला आहे. याबाबत देखील नागरिकांना बैठकांमध्ये सांगण्यात येत असते व कोणत्याही गावात बालविवाह होत असल्यास त्याबाबत हेल्पलाईन नंबरवर तात्काळ संपर्क करुन माहिती देणेबाबत आवाहन करण्यात आले असून जिल्ह्यातील नागरिकांनी देखील हेल्पलाईबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सदरच्या हेल्पलाईनवर बालविवाहाबाबत माहित देत आहेत.
दि. 7 जून 2023 रोजी “ऑपरेशन अक्षता” या उपक्रमासाठी सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर एका सुज्ञ नागरिकाने फोनकरुन माहिती दिली की, धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील सिसा गावात एका अल्पवयीन मुलीचा अस्तंबा येथील तरुणाशी साखरपुडा होणार असून विवाहाची तारीख निश्चित केली जाणार आहे. सदरची माहिती पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांना कळवून सिसा येथील साखरपुडा कार्यक्रम थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांना कायदेशीर बाबी समजावून सांगून पालकांचे समुपदेशन करणेबाबत आदेशीत केले.
त्याप्रमाणे धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी धडगांव पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने तात्काळ माहिती काढली असता, सिसा गावातील एका अल्पवयीन मुलीचा अस्तंबा गावातील एका तरुणासोबत 7 जून 2023 रोजी साखरपुडा कार्यक्रम होणार होता, परंतु त्यापूर्वीच धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण व त्यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, तिचे कुटुंबीय व गावातील नागरिक तसेच वर मुलगा व त्याच्या कुटुंबीयांना कायदेशीर बाबी समजावून सांगून होवू घातलेला बालविवाह रोखला. सिसा ता. धडगांव येथील साखरपुडा कार्यक्रमात धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण व त्यांचे पथक अल्पवयीन मुलगी व तरुणाच्या पालकांचे समुपदेशन करीत असतांनाच पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांना कळविले की, धडगांव पोलीस ठाणे हद्दीतीलच कुंडल येथे देखील एका अल्पवयीन मुलीचा खामला ता. धडगांव येथील तरुणासोबत 7 जून 2023 रोजी बालविवाह होणार आहे. सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांना कायदेशीर बाबी समजावून सांगून पालकांचे समुपदेशन करण्याबाबत त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी तात्काळ कुंडल येथे जावून माहिती काढली असता, तेथे एका अल्पवयीन मुलीचा खामला गावातील एका तरुणासोबत द 7 जून 2023 रोजी बालविवाह होणार होता, परंतु त्यापूर्वीच धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण व त्यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, तिचे कुटुंबीय व गावातील नागरिक तसेच वर मुलगा व त्याच्या कुटुंबीयांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांना बालविवाह करण्यापासून परावृत्त केले.
सिसा व कुंडल येथील दोन्ही अल्पवयीन मुलींचे व मुलांचे पालक व गावातील नागरिकांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. तसेच सिसा व कुंडल येथे कार्यक्रमाला उपस्थित असलेले नातेवाईक व नागरिकांना बालविवाहाबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन जनजागृती केली. अल्पवयीन मुलींच्या व वर मुलांच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. तसेच दोन्ही अल्पवयीन मुली व वर मुलांच्या पालकांना धडगांव पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.
सदर अल्पवयीन मुलींना बालकल्याण समिती नंदुरबार यांचे समक्ष हजर करुन त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे सदर समितीमार्फत समुपदेशन करुन सदरच्या अल्पवयीन मुली 18 वर्षाच्या होई पर्यंत त्यांचे शिक्षण, आरोग्य व कल्याणाची जबाबदारी सदर समितीमार्फत घेतली जाईल, जेणेकरुन सदर अल्पवयीन मुलींचा बालविवाह होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षताचे नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीसांना ऑपरेशन अक्षतांतर्गत तब्बत 24 बालविवाह रोखण्यात यश आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण, पोलीस उप निरीक्षक प्रवीण महाले, पोलीस हवालदार स्वप्नील गोसावी, पुष्पेंद्र कोळी, पोलीस अंमलदार विश्वजीत चव्हाण सिसा गावाचे पोलीस पाटील पंडित पाडवी व कुंडल गावाचे पोलीस पाटील हरीष पाडवी यांनी केली आहे.