नंदूरबार l प्रतिनिधी
संजय गांधी निराधार समिती व इतर समितींवर नंदुरबार जिल्हयात झालेल्या एकतर्फी सदस्य नेमणूकीला स्थगीती देण्याची मागणी शिवसेनेचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.त्यावर तातडीने नेमणुकीला स्थगिती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या निवडीला स्थगिती दिली आहे.
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, नंदुरबार जिल्हयात 6 तालुके असुन 6 तालुक्यांवर नंदुरबार जिल्हयांचे पालकमंत्र्यांनी एकतर्फी त्यांचेच कार्यकर्त्यांची वर्णी लावून नेमणूक केलेली आहे. शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांनी सुचविलेल्या नावांपैकी फक्त नावापुरते दोन-दोन लोकप्रतीनिधींची नेमणूक करुन बाकी सर्व समितींच्या जागेवर त्यांच्याच गटाचे सदस्यांची नेमणूक केलेली आहे. युतीच्या धोरणाप्रमाणे जिथे भारतीय जनता पार्टीच्या आमदार असतील तिथे 60 टक्के भा.ज.पा. व 40 टक्के सदस्य शिवसेनेचे असतील.
तसेच काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा आमदार असल्यास 50-50 टक्के पक्षाचे असतील असे ठरले असतांना शिवसेनचे फक्त दोन-दोन सदस्य प्रत्येक समितीवर घेवुन व सर्व समितीचे प्रमुख त्यांचेच नेमून पालकमंत्र्यांनी एक प्रकारे शिवसेनेवर अन्यायच केलेला आहे.
तरी नंदुरबार जिल्हयाचा सर्व समितींच्या नेमणूकीना स्थगीती देण्यात यावी अशी मागणी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी निवेदनाद्वारे केली होती.या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गांधी निराधार समितीच्या निवडीला स्थगिती देण्याचे निर्देश दिल्याने. नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी याबाबत स्थागितीचे आदेशाचे पत्र तहसीलदारांना दिले आहे.








