नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मौजे कर्जोत, गोगापूर, तितरी, डामरखेडा, शिरुड, मोहिदा, मुबारकपूर, टेंभा, शेल्टी, सोनवद, असलोद, बामखेडा, श्रीखेड, बिलाडी व म्हसावद येथील जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसिज या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी होवू नये म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संसर्ग क्षेत्रापासून दहा किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करुन 10 किलोमीटर परिघातील जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाने कार्यवाही करावी.
बाधित क्षेत्रभोवतालातील पाच किलोमीटर परिघातील जनावरांना गोट पॉक्स 100 टक्के रिंग स्वरुपात लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यक्षेत्रातील संबंधित संस्था प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, शहादा व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, शहादा यांनी लसीकरण कार्यक्रम यशस्वी करावा. जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसिज रोग बाधित परिसरातील 5 किलोमीटर परिघातील गावांमध्ये रोग प्रतिबंधक उपाययोजनांचा अहवाल सादर करावा, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.