नंदूरबार l प्रतिनिधी
जून महिना सुरु झाला की, वादळ वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला जातो. ४ जून रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात विजांचा कडकडाट व वादळवाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
नंदुरबार जिल्ह्यात देखील 4 जून रोजी चक्री वादळाचा तडाखा बसला असून चक्री वादळामुळे जिल्ह्यातील अनेक घरांची छते /पत्रे उडाली, अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजुला असलेले झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होवून जनजीवन विस्कळीत झले होते. झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. याबाबत पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना संबंधीत पोलीस ठाण्यांकडून माहिती प्राप्त होत होती. अशावेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करुन उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले होते.
नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील चिखली फाटा ते उमर्टी दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे कोसळल्यामूळे वाहतूकीची कोंडी झाली होती. म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व त्यांच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. त्याचप्रमाणे धडगांव पोलीस ठाणे हद्दीत धडगांव ते तळोदा रोड व धडगांव ते मोलगी रोडवर वादळी वाऱ्यामुळे रस्त्यांवर पडलेली झाडे धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण व त्यांच्या पथकाने रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.
त्याचप्रमाणे अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतून जाणारा अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामर्गावर कवली व खापर गावाजवळ रस्त्यावर 15 ते 20 झाडे कोसळल्यामूळे मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक खोळंबून पडली होती. अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांना सदरची माहिती मिळताच त्यांनी अक्क्लकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करुन वाहतूक सुरळीत करुन महामार्गावर अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका केली. तसेच नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील जुनी सावरट गावात वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे / छत उडून गेले होते.
नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी जुनी सावरट गावाचे पोलीस पाटील व नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने पत्रे / छत उडून गेलेल्या घरांवर गावातील नागरिकांच्या मदतीने पून्हा पत्रे बसवून त्यांना मदतीचा हात दिला. तसेच नवापूर शहरात देखील वाऱ्यामुळे झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी एम.एस. इ बी.च्या मदतीने बाजुला करुन वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केली.
तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मान्सूनपूर्व योग्य ती सर्व तयारी केली असून पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. पूर परिस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत करण्यासाठी पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोहणारे, शोध व बचाव साधनांची उपलब्धता करुन ठेवण्याचे देखील निर्देश दिले आहेत.
आपत्कालीन मदतीसाठी नागरिकांनी तात्काळ डायल-112 या टोल फ्री क्रमांकावर अगर नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज असून त्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्रत्येक पोलीस ठाणे येथे 2 प्रशिक्षीत कर्मचारी असून आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारे जेसीबी, क्रेन, लाईफ जॅकेट, दोर इत्यादी साहित्य उपलब्ध करुन ठेवण्यात आलेले आहे.








