नंदुरबार l प्रतिनिधी
आज काल तरूण पिढी उच्च शिक्षण घेत आहे. शिक्षण घेतले पाहिजे ,मात्र शिक्षणासोबत व्यावसायिक जोड असणे आवश्यक आहे. अन्यथा शिकून केवळ नोकरी मागण्यासाठी फिरतात. त्यामुळे तरूणांनी व्यवसायाकडे वळून नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनले पाहिजे, असे आवाहन माजी आ शिरीष चौधरी यांनी केले.
येथील सुशिक्षित बेरोजगार तरूण प्रसाद मराठे यांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी चप्पल घासली.मात्र नोकरी मिळत नाही, म्हणून त्यांनी वाट पाहिली नाही.वडील शिक्षक, भाऊ प्राध्यापक असतांना आपल्या कुटुंबियांचा सहाय्याने स्वतः म्हैशी खरेदी करून दुग्ध व्यवसायाला सुरूवात केली. त्या दुग्ध व्यवसायाचा माध्यमातून त्यांनी अनेक कृषी क्षेत्रातील प्रयोग राबविले. त्यातून कृषी उद्योजक ते दुग्ध प्रोडक्ट इथपर्यंत मजल मारली.त्यासाठी अथंग परिश्रम त्यांनी घेतले.
नुकतेच त्यांनी रूक्खामाई मिल्क प्रोडक्ट कंपनीची स्थापना केली. कृषी विभाग व पंजाब नॅशनल बॅंकेचा सहकार्याने नवीन जोड व्यवसायाला सुरूवात केली. त्याचे उद्घाटन माजी आमदार शिरीष चौधरी याच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक राजेश रघुवंशी ,डॉ. दीपक अंधारे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोंडे, कृषी विभागाचे अधिकारी विजय मोहिते उपस्थित होते.
यावेळी हिरा उद्योग समुहाचे प्रमुख डॉ. रविद्र चौधरी यांनीही ऑनलाईन मार्गदर्शन करीत प्रसाद मराठे हे आजचा तरूणांसाठी आयडॉल असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रसाद मराठे यांनी केले








