म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील नवागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणारा” १ तास राष्ट्रवादीसाठी” हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दादा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी डॉ.अभिजीत मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पक्ष उभारणीसाठी पक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे मंथन करण्यासाठीचा हा कार्यक्रम पक्षातर्फे दर महिन्याला आयोजित केला जातो.
या कार्यक्रमात नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने सत्ता संघर्षाच्या न्यायालयीन लढाईतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.सध्या स्थापन झालेल्या बेकायदेशीर शिंदे- फडणवीस सरकारवर न्यायालयाने ताशेरे ओढलेले असताना देखील शिंदे- फडणवीस सरकारकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी या निकालाची सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे व सत्य जनतेसमोर आणले पाहिजे,अशी असे मत या चर्चेतून पुढे आले आहे.
देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या टॅक्सच्या पैशातून उभारलेल्या नव्या संसदेत केवळ केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा व नरेंद्र मोदींचा उदो उदो केला जात आहे.हे करत असताना राष्ट्रपती पदाचा झालेला अवमान,देशाच्या लोकशाही घटनेत सर्वोच्च स्थान असणाऱ्या संसदेच्या पवित्र सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यातच लोकशाही मूल्यांची झालेली क्रूर चेष्टा या सर्व गोष्टींचा निषेध यावेळी करण्यात आला.
जगभरात आपल्या देशाची मान-अभिमानाने उंचविणाऱ्या कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन चिरडत त्यांना जी हीन वागणूक दिली जात आहे,याबाबत निषेध व्यक्त करतो महाराष्ट्रातील बी बियाणे कंपन्यांचे दक्षिणात्य राज्यात होणारे स्थलांतर,नवे कुठलेही उद्योग रोजगार न आणता,जे आहेत ते रोजगार बाहेर पळवले जात असल्याने निर्माण झालेली बेरोजगारीची भीषण समस्या,अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांवरील वाढलेल्या कर्जाचा बोजा या सर्व गोष्टींवर विचार – विनिमय करत या विरोधात आक्रमकपणे रस्त्यावरती येत भूमिका मांडण्याचा संकल्प बैठकीत मध्ये करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, जिल्हा चिटणीस सौ.मंजुळा पाडवी,शहादा तालुकाध्यक्ष माधवराव पाटील,शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष ॲड.दानीश पठान, डॉक्टर सेल जिल्हा उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र भंडारी,युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटु कुवर,आदिवासी सेल तालुकाध्यक्ष संतोष पराडके,महिला तालुकाध्यक्ष रेश्मा पवार आदि पदाधिकारी कार्यकर्ते तालुक्यातील नागरिक व महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.