नंदुरबार l प्रतिनिधी
काल गुजरात राज्यात अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला याचा तडाखा बसला होता जिल्ह्यात चक्री वादळाचा वेग सुमारे ६५ कि.मी. असल्याची नोंद कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आली आहे.या वादळामुळे जिल्ह्यात घरांची पडझड झाली आहे.
नंदूरबार जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून ऊन सावलीचा लपंडाव सुरु होता. काल गुजरात राज्यात अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्री वादळ निर्माण झाले. जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाचा वेग ४० कि.मी. प्रती तास काही भागात ६५ कि.मी. प्रतीतास इतका होता. वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील जळखे, धामडोद, शिवपूर, हरीपूर, सोनगीर, पावला, गुजर भवाली, भोणे, वाघशेपा, करजकुपा व शेजवा या गावातील सुमारे ४५ ते ५० घरांची पडझड तसेच पत्रे उडाले आहेत.
धानोरा येथे एका कापसाच्या शेडचे नुकसान झाले आहे. कार्लीजवळ रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शहादा तालुक्यात केळी बागांना चक्री वादळाचा फटका बसला आहे. तळोदा तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली असून पत्रे उडाली. नर्मदा काठावर अनेक गावांमधील घरांचे छते उडाली असून शाळांचीही पत्रे उडाली आहेत. यामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.