नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षापासून डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनाने रेशीम शेती केली जात आहे. मागील शेतकऱ्यांची यशस्विता पाहून अनेक शेतकरी हा व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहेत शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे मार्गदर्शन मिळावे म्हणून एक जून 2023 रोजी रेशीम शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्णदास भाई पाटील, अध्यक्ष, डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप पाटील, जिल्हा उद्योग अधिकारी, नंदुरबार विजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी, मानव विकास, श्री.सोनार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, मानव विकास, नंदुरबार राजेंद्र दहातोंडे प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व पिक संरक्षण तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र जालना अजय मिटकरी उपस्थित होते.
उद्घाटन सत्रात रेशीम शेती कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना राजेंद्र दहातोंडे यांनी रेशीम शेतीला जिल्ह्यात असलेला वाव लक्ष्यात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. दिलीप पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. श्री सोनार यांनी रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विक्रीव्यवस्था, लागवड, शेड उभारणी, प्रक्रिया यासाठी सहकार्य मिळेल असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णदासभाई पाटील यांनी रेशीम शेती करताना बऱ्याच तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे या व्यवसायाचा तांत्रिक मार्गदर्शन घेऊन घेऊनच सुरू करण्याचे आवाहन केले.
तांत्रिक सत्रात पिक संरक्षण तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार पद्माकर कुंदे, यांनी रेशीम शेतीला जिल्ह्यात अनुकूल असलेले हवामान व सद्यस्थितीत केली जाणारी रेशीम शेती याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.अजय मिटकरी यांनी रेशीम शेतीसाठी जमीन, हवामान, नर्सरी व्यवस्थापन व कोष उत्पादन यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जालना जिल्ह्यात केली जाणारी रेशीम शेती उपस्थितांना सांगितली. इतर पिकांच्या तुलनेत रेशीम शेती कशी फायदेशीर आहे हे त्यांनी वेगवेगळ्या पिकांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. त्यामानाने कमी खर्चाचा हा व्यवसाय असून माशिक पैसा यापासून मिळू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितल. कार्यक्रमात शेवटी रेशीम उद्योग अधिकारी, नाशिक पी. व्ही. इंगळे, यांनी शासकीय योजना व नोंदणी प्रक्रिया याविषयी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील रेशीम शेती करणारे शेतकरी तसेच ही शेती करण्यासाठी उत्सुक असलेले शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.