नंदूरबार l प्रतिनिधी
खरीप हंगाम १५ दिवसांवर आला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन सुरू झाले आहे. परंतु त्यासाठी हवामानाचा अंदाज घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. यंदा जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, पहिल्या जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो तसेच तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते त्यामुळे शेतकरी बांधवांनी यंदा उपलब्ध पाण्याचे सुद्धा योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
मागील सलग ३ वर्ष ला नीना असल्यामुळे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आणि या वर्षी एल निनो चे संकट ओढावण्याची शक्यता असल्याने पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकताच मान्सूनचा दीर्घ कालावधी (जून ते सप्टेंबर) अंदाज जाहीर केला. त्यानुसार यावर्षी संपूर्ण देशात सर्वसाधारण ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. परंतु खानदेश आणि मराठवाडा विभागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. त्यानसार शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता असल्याने पेरणी सुद्धा उशिरा होऊ शकते. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोसमी पाऊस सुरु होण्याची शक्यता असून पेरणीयोग्य ७५ ते १०० मिली पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पावसाचे प्रमाण कमी असल्याने लवकर येणाऱ्या पिकांच्या जातींना प्राधान्य देवून सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन करावे. पेरणी उताराला आडवी करावी. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
तसेच पेरणी करताना मूलस्थानी जलसंधारणाकरीता रुंद वरंबा सरी पध्दती वर पेरणी करावी ज्यामुळे कमी पाऊस झाल्यास ओलावा जास्त वेळ टिकून राहील. असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहून आणि पुरेसा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. एल निनो मुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याने त्यानुसार कमी कालावधीची पिके, कमी पाणी लागणारे, कमी कालावधीचे वाण तसेच पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची निवड करावी. कापसाची पेरणी करताना पाण्याची उपलब्धता पाहून करावी.
सचिन फड कृषी हवामान शास्त्रज्ञ
कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून जिल्ह्याचा तसेच तालुकानिहाय हवामानाचा अंदाज (पाऊस, तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता आणि ढग स्थिती) व त्यानुसार पीकनिहाय कृषी सल्ला देण्यात येतो ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे योग्य नियोजन करण्यात मदत होते आणि होणारे नुकसान कमी करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिकेचा वापर करावा.
राजेंद्र दहातोंडे,
वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख